अविनाश कानडजे (औरंगाबाद), 25 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने लाखो हेक्टर जमीनीतील पिकांना फटका बसला. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी करत आहेत. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, पंचनामे सुरू झाले नाहीत, नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे आणि फटाके नाही.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचा तो निर्णय, अजितदादांकडून कौतुक पण शरद पवारांची टीका
त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ दिवाळी स्मशानभूमीतच साजरी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.
उद्धव ठाकरेंनी केली सरकारकडे मागणी
पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा : साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली, शंभूराजेंची रामराजेंवर खरमरीत टीका
एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असं वातावरण आहे. 'गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड पाऊस झाला, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आज ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झालं. पण ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Farmer protest