औरंगाबाद, 7 फेब्रुवारी : आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेमध्ये राडा झाला आहे. या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला आहे. या गोंधळामागे गद्दारांमधले कुणी होते का? हे तपासावं लागेल, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे इशारा केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे.
'भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केलं आहे. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहेत. सरकारने आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवावी,' अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एक दगड आला आणि जमलेल्या गर्दी मधून आमदार बोलणारे यांच्या नावाने घोषणा होत होत्या. शिंदे गटाचा यामध्ये हस्तक्षेप असून त्यांनीच हे प्रकरण घडवून आणल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत राडा, मिरवणुकीतला डीजे थांबवल्यामुळे कार्यकर्ते संतप्त#AadityaThackeray #Shivsena pic.twitter.com/la2MgCeojR
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2023
काय झाला राडा?
रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेज मागून मिरवणूक जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.
आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेमध्ये भाषण उरकलं. सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर ठोसे मारले. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना गावाच्या बाहेर नेण्यात आलं. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर प्लास्टिकचे दोन पाईप फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणास्तव डीजे बंद झाला असेल, मी त्यांची माफी मागितली. शिवशक्ती भीमशक्ती आज एक आहे, आम्ही संविधानासाठी लढत आहोत. काही अडचण झाली असेल तर माफी मागतो. डीजे बंद झाला असेल 5-10 मिनीटांसाठी, मी माईकवरूनही डीजे चालू द्या, म्हणून सांगितलं,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Shivsena