औरंगाबाद, 17 जानेवारी : बदलत्या काळात जगभर व्यवहार करण्यासाठी इंग्रजीसोबतच आणखी एक विदेशी भाषा यायला हवी. विदेशी भाषांचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचे प्रशिक्षण राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये सुरू करण्यात आले. सुरूवातीला फक्त काही शहरांमध्ये आणि त्यामधील काही ठराविक वर्गापर्यंत असलेल्या या प्रशिक्षणाचा आता विस्तार होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्येही फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे.
औरंगाबादच्या हरसूल भागात असलेल्या महापालिकेच्या केंद्रीय शाळेचा आर्यन राजगुरे या विद्यार्थ्यानं फ्रेंच भाषेच्या परीक्षेत देशात अकरावा क्रमांक पटकावलाय. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत त्यानं हे यश मिळवलंय. त्याच्या या यशाचं रहस्य काय आहे पाहूया...
कसं मिळवलं यश?
फॉरेन लँग्वेज असोसिएशनकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऑनलाईन कोर्स राबविला जातो. डिसेंबर 2022 मध्ये पाचवी ते सातवी गटामध्ये महापालिकेच्या हर्सूलमधील शाळेच्या विद्यार्थ्यानं यश मिळवलं. या शाळेच्या आर्यन अंकुश राजगुरे यानं या परीक्षेच देशात अकरावा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला.
सुरूवातीला डोक्यावरुन गेलं...
'उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. तू हा कोर्स कर तुला संधी मिळतील, असं मला शिक्षकानं सांगितल्यावर मी हा कोर्स करण्याचं ठरवलं. मला मराठी आणि हिंदी भाषा ऐकण्याची सवय होती. या कोर्समध्ये सर्व संवाद फ्रेंचमधून होत होते. त्यामुळे मला काही समजत नव्हतं. माझ्या डोक्यावरून जात होतं. अनेकवेळा डोकंही दुखलं. त्यामुळे मला टेन्शन आलं होतं.
क्या बात है! विद्यार्थ्यांनी तयार केलेली 150 सॅटेलाईट अवकाशात झेपवणार, Video
माझे शिक्षक संजय कुलकर्णी आणि आई-वडिलांनी समजावून सांगितलं हळूहळू सराव सुरू ठेवला आणि त्यानंतर मला जमायला लागलं. मी सराव सुरू केला. मला शिक्षकांनी फोनवर परीक्षेचा निकाल सांगितला तेव्हा खूप आनंद झाला. मी भविष्यात फ्रेंच भाषेतच करिअर करणार आहे,' अशी प्रतिक्रिया आर्यननं दिली.
'खासगी आणि सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता सारखीच असते. खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळतात. सरकारी शाळेत सर्व सुविधा नसल्यानं अडचणी येतात. त्यांना संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करू शकतात हे आर्यननं दाखवून दिलंय, आम्ही भविष्यात शाळेच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषेचं शिक्षण देणार आहोत,' असं मुख्याधिपिका उर्मिला लोहार यांनी सांगितलं.
'आर्यननं आम्हाला फ्रेंचबद्दल सांगितलं तेव्हा नेमकं कळालंच नाही. पण, त्यानं शाळेचा अभ्यास सांभाळून फ्रेंचचा अभ्यास केला. सुट्टीच्या काळात फ्रेंच भाषा शिकली आणि देशात अकरावा क्रमांक पटकावला. आम्हाला याचा अभिमान वाटतो, अशी भावना आर्यनच्या आई कीर्ती राजगुरे यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, School