औरंगाबाद, 5 डिसेंबर : मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात गेल्यावरुन राजकारण तापलं आहे. अशात आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणीसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजूरी दिली आहे. यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हत्ती गुजरातला हलवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देऊन त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या 15 दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यात सर्वाधिक 14 वाघ आहेत. बहुतेक प्राण्यांच्या जोड्या आहेत. परंतु, सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या अनुषंगाने देशभरातील विविध प्राणीसंग्रहालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. गुजरातमधील अहमदाबाद येथील प्राणीसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शवली. परंतु, त्याबदल्यात त्यांनी दोन पिवळे मादी वाघ देण्याची अट सांगितली होती.
वाचा - Gujarat Elections 2022: गुजरात निवडणूक रंजक वळणार; सत्तेची चावी मात्र या समाजाच्या हाती
यापूर्वी हत्ती गुजरात नेले
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती काही दिवसांपूर्वी गुजरातला हलवण्यात आले. केंद्र सरकारच्या मंजुरीने ताडोबातील सहा हत्तींचा प्रवास गुजरातच्या दिशेने सुरू झाला होता. यामध्ये चार नर आणि दोन मादी हत्तींचा समावेश आहे. गुजरातमधील राजनगरातील राधे कृष्णा टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे हे हत्ती सोपविण्यासाठी केंद्र सरकारने महिनाभरापूर्वी मंजुरी दिली होती. याबाबतच्या पत्रातील मजकूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने उघड केला होता.
ताडोबात कर्नाटकमधून दुसरे हत्ती येणार
ताडोबात हत्तींची नितांत गरज आहे. येथे येणारे हत्ती आता प्रशिक्षित असणार आहेत. येथे हत्तींच्या देखभालीसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ व माहुत देखील असणार आहे. हे नवीन हत्ती कर्नाटकमधून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ताडोबा जागतिक स्तरावरचा व्याघ्र प्रकल्प आहे. येथील हत्तींची कमी लवकरच भरून काढली जाईल, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.