सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 2 मार्च : निवृत्तीनंतर बहुतेक जण आपला वेळ हा आराम करण्यात घालवतात. पण, या वयातही काहीतरी नवं करण्याची जिद्द असलेली काही मंडळी आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या सेवा निवृत्त अधिकाऱ्यानं चक्क सायकलवर साडेचार हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. या संपूर्ण मोहिमेचा त्यांचा उद्देशही खास आहे.
66 व्या वर्षीही फिट
दिनकर भिकाजी बिरारे असं त्यांचं नाव आहे. बिरारे हे सिडको कार्यालयातून क्षेत्रीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. अधिकारी पदावर गेल्यानंतरही त्यांनी साधेपणा सोडला नाही अधिकारी असल्यामुळे त्यांना दारापासून कार्यालयापर्यंत चार चाकी वाहन होतं मात्र या चारचाकी वाहनामुळे शरीराला आळस येईल यामुळे ते चार चाकी वाहनानं न घेता पायी घरापासून कार्यालयापर्यंत जात असत.
सिडको कार्यालय मध्ये त्यांनी 36 वर्ष सहा महिने नोकरी करत क्षेत्रीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्ती घेतली.आज 66 व्या वर्षांमध्ये त्यांना एकही औषध गोळी सुरू नाही त्यांना कुठल्याही आजार झालेला नाही. यामुळे ते 66 व्या वर्षी देखील स्वतःच्या शेतीमध्ये अकराशे सीताफळांची झाडे जगवतात आणि त्यांची मशागतही करतात.
आईच्या प्रेमापोटी अधिकाऱ्याचं बदललं आयुष्य, निवृत्तीच्या पैशातून उभारलं वृद्धाश्रम, Video
का केला खटाटोप?
'मी वयाच्या 66 व्या वर्षी देखील निरोगी आहे. माझा देशही निरोगी असावा अशी माझी इच्छा आहे. देशाची तरुण पिढी निर्व्यसनी आणि आरोग्यसंपन्न असावी यासाठी मला काम करायचं आहे. या उद्देशानं मी औरंगाबादपासून नर्मदा परिक्रमेचा साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास सायकलीनं केला.' असं बिरारे यांनी सांगितलं. या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी व्यसनाधीनता आणि योगसानच्याबाबतीत जनजागृती केली.
'या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. लोकांनी भरभरून प्रेम दिले त्याबद्दल मी प्रत्येकाचा आभारी आहे. मला या प्रवासात सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. सकारात्मकतेनं काम केलं तर प्रत्येकाचं आयुष्य सुंदर होईल, असं बिरारे यांनी सांगितलं.
कसा केला प्रवास?
बिरारे यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी प्रवास सुरू केला. त्यानंतर 2 जानेवारी 2003 रोजी ते ओंकारेश्वरला पोहचले. 4 जानेवारी रोजी ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन त्यांनी परिक्रमेला सुरूवात केली. त्यांनी रोज 50 ते 60 किलोमीटर प्रवास केला. या प्रवासाच्या दरम्यान त्यांना कुणी घरात तर कुणी मंदिरात जेवण दिलं. या दरम्यान कोणताही त्रास जाणवला नसल्याचं बिरारे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.