औरंगाबाद, 14 डिसेंबर: गेली काही दिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (corona pandemic) नियंत्रणात राहिल्यानंतर, ओमिक्रॉनच्या रुपाने (omicron variant) कोरोना प्रादुर्भाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona vaccination) करणं हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढत असूनही अनेक नागरिक कोरोना लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तर कोरोना लशीचा पहिला डोस घेऊन तीन महिने उलटल्यानंतर देखील अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. अशात कोरोना लशीचा दुसरा डोस न घेणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील नागरिकांना आता उद्यापासून एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागणार नाही. दुसऱ्या डोससाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत आपलं लसीकरण करून घ्यावं, अन्यथा 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काढला आहे.
हेही वाचा-चिंता वाढली..! Omicron चा गड ठरणार महाराष्ट्र?, निम्म्याहून अधिक रुग्ण राज्यातच
औरंगाबाद जिल्ह्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 15 डिसेंबरपर्यंत लस न घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी सांगितलं की, लग्नसमारंभाच्या ठिकाणी नागरिकांचं लसीकरण करण्यात यावं. तसेच दुकानदारांनी स्वत:चं आणि दुकानातील कामगारांचं लसीकरण करावं, तसा लसीकरण झाल्याचा फलक दुकानाबाहेर लावावा. तसं न केल्यास दुकान सील केलं जाईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-नगरमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढला; हाय रिस्क देशातून 86 प्रवाशी जिल्ह्यात दाखल
खरंतर, दुसरा डोस न घेणाऱ्या लोकांची संख्या ग्रामीण भागात सर्वाधिक आहे. अशा नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावं, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे. औरंगाबाद शहरात एकूण 10 लाख 55 हजार 600 लोकाचं लसीकरण होणं अपेक्षित आहे. पण आतापर्यंत 8 लाख 44 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर पहिला डोस घेऊन तीन महिने झाल्यानंतरही दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या 67 हजार इतकी आहे. तर 2 लाख 11 हजार नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नाही. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावं, यासाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.