औरंगाबाद, 04 जानेवारी : महाविकासआघाडीच्या खातेवाटप होण्याआधीच सेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले. एवढंच नाहीतर सत्तार यांच्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला फटका बसला. सत्तार यांच्या या कृतीवर सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले. अब्दुल्ल सत्तार हे गद्दार असून त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, अशी सडकून टीका खैरेंनी केली.
'महाविकासआघाडीमुळे अब्दुल सत्तार हे मंत्री झाले. तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांच्यामुळे भाजपला मदत मिळाली. सत्तार यांनी सेनेशी गद्दारी केली आहे. आम्ही शिवसेना मोठ्या कष्टाने उभी केली आहे. आज महाविकासआघाडीमुळे मंत्री झाल्यानंतर असं वागणे हे सहन करण्यापलीकडे आहे. सत्तार हे गद्दार आहे. त्यांना 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका. मुंबईतले शिवसैनिकही त्यांना मातोश्रीवर पाय ठेवू देणार नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
तसंच, 'सत्तार यांनी ब्लॅकमेल केलं असून पक्षासोबत गद्दारी केली आहे. 6 सदस्य त्यांनी भाजपकडे कसे पाठवले, असा आरोपही खैरे यांनी केला. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून सत्तार यांच्याबद्दल तक्रार करणार असल्याचंही खैरे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सत्तार यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहूनच दाखवावं, असा थेट इशाराही खैरेंनी दिला.
काय घडलं औरंगाबाद महापालिकेत?
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अब्दुल सत्तार यांची समजूत काढल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र, अब्दुल सत्तार यांचा निरोप शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारापर्यंत पोहोचलाच नाही.
औरंगाबाद जिल्हा परिषदअध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाताई शेळके यांचा विजय झाला आहे तर उपाध्यक्षपदी भाजप चे एल.जी.गायकवाड विजयी झाले आहेत. या निवडणुकीत माजी अध्यक्षा देवयानी डोनगवकर यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान 30-30 मते पडली होती. त्यानंतर इश्वर चिठ्ठीत शेळके यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेते अर्जुत खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत तसं घडलंच नाही आणि ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे.
दरम्यान, शुक्रवारीदेखील औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.