औरंगाबाद, 5 डिसेंबर : हत्या आणि विनयभंगाचा आरोप असलेल्या आणि न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावलेल्या कैद्याने उपचाराचा बहाणा करत घाटी रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. दुपारपर्यंत पोलिसांकडून या फरार आरोपीची शोधाशोध सुरू होती.
किशोर विलास आव्हाड असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी आव्हाड विरोधात हत्येचा आरोप आहे, तसंच 2019 मध्ये त्याने मुलीसोबत रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला दुचाकीवरून सोडण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यांमध्ये आरोपीला पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! महिलेने मुलांसाठी स्वत:लाच केलं दफन; तब्बल 9 वर्षांनंतर गुपित झालं उघड
तेव्हापासून तो हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आजारी असल्याचा बहाणा करून तो घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक -18 मध्ये त्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवत तेथून पसार झाला.
ही बाब लक्षात येताच पोलिसांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस फरार आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.