VIDEO: 'औरंगजेब सेक्युलर नव्हता'; नामांतर वादावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीर केली थेट भूमिका

VIDEO: 'औरंगजेब सेक्युलर नव्हता'; नामांतर वादावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीर केली थेट भूमिका

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून आघाडीत बिघाडी होते का, अशी परिस्थिती आहे. शिवसेना पूर्वीपासूनच या शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जानेवारी: गेले काही दिवस औरंगाबादचं नामांतर करण्याचा विषय पुन्हा एकदा राजकीय आघाडीवर गाजत आहे. महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत काँग्रेसने नामांतरला त्यांचा विरोध स्पष्ट केल्यानंतरही शिवसेनेकडून संभाजीनगर असा उल्लेख शासकीय पातळीवर होत राहिला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांना छेडलं असता, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या वादावर त्यांची भूमिका जाहीर केली.

औरंगाबादचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालाकडून अधिकृतपणे संभाजीनगर असा केला जात आहे, असं विचारल्यावर ठाकरे यांनी "हो मग त्यात वेगळं काय आहे," असं म्हणत आपला पवित्रा दाखवला. 'वर्षानुवर्षं आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला होता', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. याची आठवण देताच ठाकरे म्हणाले, "औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही." मुख्यमंत्र्यांच्या या थेट काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे आता नव्या वादाची ठिणगी पडू शकते.

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्याच्या फोटोसह औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आणि यावरून पुन्हा आघाडीचं अंतर्गत वातावरण तापलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी थेटपणे यावर राग व्यक्त करत संभाजीनगर उल्लेखावर आक्षेप नोंदवला.

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून आघाडीत बिघाडी होते का, अशी परिस्थिती आहे. शिवसेना पूर्वीपासूनच या शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करत आली आहे. आता मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर या शहराचं अधिकृत नामांतर होईल, अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे. पण आघाडीतल्या काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे. तीन पक्षांचं सरकार येण्याआधी तयार केलेल्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा विषय होता की नव्हता यावरून खरं-खोटं झाला, आता मुख्यमंत्र्यांनी थेट औरंगजेब सेक्युलर नव्हता, असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

नामांतर वादाचा इतिहास

शिवसेनेनी जून 1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव मांडला होता आणि पासही करून घेतला होता पण काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याला विरोध करत पहिल्यांदा उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

औरंगाबादेत नामांतर झालं तर आपल्या मुस्लीम व्होटबँकेला धक्का लागेल अशी भीती काँग्रेसच्या मनात असल्याने त्यांनी नामांतराला विरोध केला आहे.

First published: January 8, 2021, 7:46 PM IST

ताज्या बातम्या