औरंगाबादेत तणाव! मशिदीत नमाझ अदा करण्यापूर्वी खासदार इम्तियाज यांना घेतलं ताब्यात

औरंगाबादेत तणाव! मशिदीत नमाझ अदा करण्यापूर्वी खासदार इम्तियाज यांना घेतलं ताब्यात

मशिद प्रवेशावर खासदार इम्तियाज जलील हे ठाम असल्यामुळे औरंगाबाद शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 2 सप्टेंबर: परवानगी नसतानाही मशिद उघडून नमाझ अदा करण्यासाठी जाणारे एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, मंदिर-मशिद प्रवेश करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्यंवर अत्यंत खोचक टीका

खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे शहागंज मशिद परसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

काय म्हणाले, MIM खासदार?

MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं की, आमचं आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. आम्ही मशिदीत हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो. मोजक्याच लोकांना घेऊन आम्ही मशिद उघडून नमाझ अदा करणार होतो. मात्र, त्यासाठीच पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि ताब्यात घेतलं. मात्र, राज्य शासनानं धार्मिकस्थळं लवकरात लवकर उघडावीत, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे. तसेच शहागंजमधील मशिद परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील खासदार जलील यांना केलं आहे.

शिवसेनेच्या विरोधानंतर खासदार जलील यांचं मंदिर आंदोलन मागे

दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. खासदार जलील मंदिरात प्रवेश करणार होते. तितक्यात MIM मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, खासदार जलील हे मशिद उघडून नमाझ अदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

खासदार इम्तियाज जलील हे काल (मंगळवारी) दुपारी दोन वाजता खडकेश्वर मंदिरात प्रवेश करणार होते. आंदोलनासाठी MIM चे कार्यकर्ते मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थितही झाले होते. मात्र, मंदिर परिसरात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह त्यांचे कार्यकर्त्ये पोहोचले. मंदिर उघडण्यास शिवसेनेनं विरोध केला आहे. खडकेश्वर मंदिर हे हिंदुंच मंदिर आहे. खासदार जलील हे मुस्लिम आहेत. त्यामुळे ते हिंदुंच्या मंदिरात प्रवेश कसे करू शहतात, असा सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिवसेना- MIM आमने-सामने आली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा...टीव्ही रिपोर्टरच्या निधनानंतर राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, तातडीने चौकशीचे आदेश

दरम्यान, 1 सप्टेंबरला हिंदू मंदिर आणि 2 सप्टेंबर मशिद उघडणार असल्याचा इशारा खासदार जलील यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राज्यातील धार्मिक स्थळं बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी नाही. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील धार्मिकस्थळं बंदच राहाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या