सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 6 मार्च : प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा ट्रॅकवर येत नसल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आता एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची उमेदवारी पुढे येत आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान काँग्रेस राष्ट्रवादी केला तर एमआयएम बाजूला राहील असं ठरलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँगेस राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाबाबत जमत नाही. त्यामुळे आता वेगळी गणित मांडली जात आहेत. एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
'असदुद्दीन ओवेसी आणि आंबेडकर यांनी ठरवले तर आपण लोकसभेच्या रिंगणात उतरू,' असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची रंगत वाढणार, असंच सध्याचं चित्र आहे.
दरम्यान, : लोकसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे. नांदेड, बारामती आणि माढा या जागांची मागणी काँग्रेस-राष्ट्रावादीकडे करण्यात आली आहे. यात माढामधून शरद पवार तर बारामतीतून सुप्रिया सुळे या उभ्या राहणार आहेत. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या ही मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी मान्य करणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
माढा, बारामती आणि नांदेडची जागा प्रकाश आंबेडकरांकडून मागण्यात आली म्हणजे ते युती करण्यासाठी तयार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. बरोबर येण्यासाठी आम्ही आंबेडकरांना विंनती करू असंही आव्हाड म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे. आमची मनापासून इच्छा आहे की आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. मोदी लाटेत बारामती, माढा, नांदेड जागा निवडून आल्या तर काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी लवकरच ठरवतील असंही आव्हाड म्हणाले.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडी बरोबर बैठक झाली. यासाठी अशोक चव्हाण, विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मण माने आणि इतर सदस्य उपस्थित होते.
मंगळवारी झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने २२ जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने 22 जागावर उमेदवार घोषित केले. त्या 22 जागांची मागणी चक्क वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे केली असं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी दिलं आहे.
SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!