काँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला त्याच्याच शेतात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला त्याच्याच शेतात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

  • Share this:

14 जून : सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार पुन्हा वादात सापडलेत. जमीन खरेदी विक्रीच्या वादातून या आमदार महाशयांनी सिल्लोडच्या तीन शेतकऱ्यांना शेतात जाऊन अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 13 जून रोजीची ही घटना आहे.

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत. या ठिकाणी असलेल्या शेतजमिनीवरून अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात वाद आहे. अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्या शेतजमिनी आजुबाजूला आहेत. मात्र, अब्दुल सत्तार आपली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मुख्तार यांचं म्हणणं आहे.

कालदेखील याच मुद्द्यावरून अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात वाद झाला. यावेळी अब्दुल सत्तार यांच्याबरोबर पोलीस आणि कार्यकर्ते होते. सुरुवातीला अब्दुल सत्तार आणि मुख्तार सत्तार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी मुख्तारला शिवीगाळ केली. तसंच त्यांच्या मुलाने आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मुख्तार सत्तार यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्तार सत्तार यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलीस राजकीय दबावापोटी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मुख्तार यांनी केला आहे. या आधीही सत्तार यांनी मंत्रीपदी असताना एका कार्यकर्त्याला लाथाबुक्क्याने मारल्यानं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

First published: June 14, 2017, 2:33 PM IST

ताज्या बातम्या