आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का? विदारक स्थिती मांडत एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का? विदारक स्थिती मांडत एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 27 जुलै : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारीही अडचणीत आले आहेत. अशातच औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. आम्ही दोन बहिणी आहोत. आमचे शिक्षण बाकी आहे. आता कोरोनाच्या अशा परिस्थितीत आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का? असा सवाल औरंगाबादेतील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांना सामाजिक माध्यमावरून केला आहे.

नंदिनी सुरवसे असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेल्या या मुलीचं नाव आहे. तिचे वडील सुरवसे हे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. नंदिनी ही इयत्ता 12विज्ञान शाखेत शिकत आहे. कोरोनामुळे मार्चपासून एसटीची सेवा कोलमडली आहे. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती नंदिनी हिनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. आमची घरची परिस्थिती बिकट आहे. गावाकडे शेतही नाही. एसटी कर्मचारी आणि कुटूंबीय मरणाच्या दारात उभे आहे. त्यांना फक्त मायबाप सरकार वाचवू शकते. ही सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. तरीही शासन एसटीला शासनात का विलीन करीत नाही, एसटी कर्मचाऱ्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का, असा प्रश्न नंदिनीने उपस्थित केला आहे.

मुलीने मांडलं विदारक सत्य

काही कर्मचारी भाजी विकत आहे. कोणी गवंडी काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार अत्यल्प आहे. त्यातच कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कुटूंबाचा खर्च भागविण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 10 ते 25 हजार रुपये लागतात, असे तिने पत्रात नमूद केले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 27, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या