Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर दाखवला विश्वास? औरंगाबादमध्ये एण्ट्री झाल्यावर जोरदार चर्चा

मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर दाखवला विश्वास? औरंगाबादमध्ये एण्ट्री झाल्यावर जोरदार चर्चा

औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची एण्ट्री झाल्यानंतर एक मुद्दा मात्र भलताच चर्चिला जाऊ लागला आहे.

औरंगाबाद, 5 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची एण्ट्री झाल्यानंतर एक मुद्दा मात्र भलताच चर्चिला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ला करीत असतात. आज मात्र उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर शिक्का मोर्तब केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले हेलिकॉप्टर चक्क समृद्धी महामार्गावर लँड केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास टाकला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला होता. कारण या महामार्गाला अनेकदा विरोध झाला. मात्र या विरोधानंतर फडणवीस यांनी महामार्गाचं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी थेट या महामार्गावर हेलिकॉप्टर लँड करत महामार्गाच्या दर्जावर शिक्कामोर्तब केलं आहे का, असं विचारलं जात आहे. दरम्यान, या महामार्गाच्या आढाव्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्यासंदर्भातील संदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. समृद्धी महामार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण करा : उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या