सचिन जिरे (प्रतिनिधी),
औरंगाबाद, 28 जुलै: कर्जबाजारी झालेल्या एका तरुणानं चक्क ओळखीच्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलावर रिव्हॉल्वर रोखून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावून त्याला पकडलं. ही खळबळजनक घटना मंगळवारी दिवसाढवळ्या हर्सूल जवळील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत घडली.
हेही वाचा...राम मंदिर उभं राहिल्यानंतर Corona Virus होईल नष्ट; आता भाजप खासदार बरळल्या
पोलिसांनी हल्लेखोर तरुणासह गावठी रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. राहुल रावसाहेब आधाने असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, संजय गाडे हे वाळूज औधोगिक परिसरात एका कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. गाडे आणि आरोपी राहुलच्या नातेवाईकांचे चांगले संबंध आहे. मात्र गाडे परिवार मधील कोणीही राहुलला ओळखत नाही. मात्र राहुलला गाडे परिवारातील सदस्यांची संपूर्ण माहिती होती. गाडे परिवार धनाढ्य असल्याचे त्याला ठाऊक होते.
आरोपी राहुल हा रांजणगाव येथील दूध डेअरीवर कामाला आहे. त्याच्यावर अनेकांची उधारी आहे. पैशासाठी अनेक जण त्याकडे तगादा लावत होते. पैशे फेडण्यासाठी त्याने चक्क ओळखीच्याच गाडे परिवाराला लुटण्याचा प्लॅन बनवला. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहुल शहरातील हर्सूल भागात आला. त्याने गाडे यांचे दार ठोठावलं असता गाडे यांच्या लहान मुलाने दरवाजा उघडला त्यावेळी मला गणेश दीक्षित यांनी पाठवलं असे सांगून त्याने घरात प्रवेश केला. व काही मिनिटांतच त्याने गाडे यांच्या मुलावर गावठी रिव्हॉल्वर रोखलं. दरम्यान तेथे गाडे यांच्या पत्नी आल्या त्यांनी आम्ही पैसे देतो, अशी थाप मारत वरील खोलीत घेऊन गेल्या. तोपर्यंत बाजूच्या खोलीत झोपलेले गाडे व त्यांचा लहान मुलगा दोघेही वरील खोलीमध्ये आले. एकाच वेळी चौघांनी आरोपी राहुलवर हल्ला चढवला या हल्ल्यात त्याच्या हातातील रिव्हॉल्वर खाली पडली.
हेही वाचा...कोरोनाची दहशत असताना कोकणात अज्ञात आजाराचं थैमान, गुहागरमध्ये 19 जणांचा मृत्यू
घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर बसलेल्या तरुणांनी त्याला पळताना पकडलं. ही माहिती पोलिसांनी देताच तातडीने हर्सूल पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत त्याच्या जवळील रिव्हॉल्वर जप्त केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.