अखेर राहुल गांधी पास झाले!

अखेर राहुल गांधी पास झाले!

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सतत पराभव होत असल्यामुळे पक्षातलेच लोकं राहुल गांधींवर नाराज झाले होते.

  • Share this:

11 डिसेंबर : 'जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, आम्ही पराभव स्वीकारतो' आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीत राहुल गांधी यांचे ही वाक्य नेहमी ठरलेली होती. गेली चार वर्ष त्यांना हा कित्ता प्रत्येक निकालानंतर गिरवावा लागला. पण, आज चार वर्षानंतर अखेर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशममध्ये काँग्रेसने भाजपच्या गडाला सुरूंग लावला आहे. या विजयामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे.

'अब की बार मोदी सरकार' अशी गर्जना करत मोदी लाटेवर स्वार होत भाजपने केंद्रात काँग्रेसच्या सरकारला उलथवून लावली. केंद्रात बहुमतात सरकार आल्यानंतर मोदी लाटेनं अवघा देश नाहुन निघाला. त्यामुळे स्थानिक निवडणूक असो की विधानसभा निवडणूक प्रत्येक ठिकाणी भाजपचा विजय हा निश्चित झाला. त्यामुळे काँग्रेसचे चांगले चांगले दिग्गज नेते पराभूत झाले. या पराभवामुळे सोनिया गांधी यांच्यासह सर्वच दिग्गज नेते बेजार झाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सतत पराभव होत असल्यामुळे पक्षातलेच लोकं राहुल गांधींवर नाराज झाले होते.

विजयी रथावर स्वार झालेले नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची प्रचंड खिल्ली उडवली. सोशल मीडियावर तर राहुल गांधींच्या नावाने जोक्स, मिम्स प्रचंड व्हायरल झाले आणि ते आजही होतात.

पण काळ जसा बदलत गेला तशी भाजपच्या शिडीतून हवा निघत गेली. नोटबंदी, जीएसटी, राफेल करार, गो हत्यासह अशा अनेक निर्णयांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली. हेच हेरुन राहुल गांधी यांनी भाजपला धारेवर धरत जोरदार हल्लाबोल सुरू केला.

त्यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. पण जे भाजपने गोव्यात आणि छत्तीसगडमध्ये केलं होतं तोच नियम कर्नाटकात वापरून जेडीएसला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. दुसरीकडे पंजाबमध्येही काँग्रेस निवडणूक आली.

कर्नाटक आणि पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चांगलाच उत्साह संचारला. राहुल गांधी यांनी आक्रमकपणा अंगीकृत करत भाजपला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. मग कुठे तिखट शब्दात टीका तर कुठे मोदींची गळाभेट घेऊन राहुल गांधींनी एकच धुराळ उडवून दिला.

नोटबंदी, जीएसटी, राफेल करार आणि वेगवेगळ्या घोषणाबाजीमुळे टीकेचं धनी झालेलं मोदी सरकार पाच राज्यांच्या निवडणुकीला सामोरं गेलं. या विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार होते तिथे लोकांचा प्रचंड रोष सरकारवर होता. हेच हेरून काँग्रेसने प्रचार केला आणि त्यात त्यांना यश मिळाले.

राजस्थानमध्ये महाराणींच्या हुकुमशाहीला कंटाळलेल्या राजस्थानच्या जनतेनं भाजपला साफ नकार दिला. राजस्थानच्या जनतेनं 'तुम्ही नकोच' असं म्हणत काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्यात. छत्तीसगडमध्ये रमलेले रमण सरकारही धाडकनं खाली कोसळलं. काँग्रेसने 90 पैकी 66 जागा जिंकून भाजपच्या तावडीतून अक्षरश: सत्ता हिसकावून घेतली. मध्यप्रदेशमध्येही गेली 15 वर्ष सत्तेचं फळ चाखणाऱ्या शिवराजसिंग चौहान यांना धक्का देत इथंही काँग्रेसने सत्तेवर दावा ठोकला आहे.

मोदी सरकारविरोधात जनतेचा रोष आणि राहुल गांधी यांचा आक्रमक प्रचार आता काँग्रेसला नवी उभारी देऊ पाहत आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून निराश झालेले कार्यकर्ते आज बेभान होऊन जल्लोष करत आहे. 'हमारा नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो' असं म्हणत कार्यकर्ते गुलालाने माखले आहे.

हल्ली निवडणुकीच्या दरम्यान वृत्तवाहिन्यांवर विश्लेषण कार्यक्रमात बचावाचा सामना करणारे प्रवक्ते आज सत्ताधारी भाजपवर तुटून पडल्याचं पाहण्यास मिळत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचा प्रत्येक नेता, कार्यकर्ता राहुल गांधी यांचा जयघोष करत आनंद साजरा करत आहे.

कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा जेव्हा आनंदी होतो तेव्हा त्या पक्षाची ऊर्जा आपोआप वाढली जाते हाच मात्रा आता काँग्रेसला लागू झालेला आहे. तीन राज्यात मिळालेलं घवघवीत यश राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब करणारं आहे. 2014 ला नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी जशी काँग्रेसला मोदींची भीती वाटत होती आता तशी भीती भाजपच्या गोटात निर्माण झाली आहे.

राहुल गांधी आता मोदींच्या समोर उभं ठाकण्यासाठी तयार झाले आहे हे आजच्या पाच राज्यांच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना तर अटळ आहे पण राहुल गांधी आता दोन पाऊल पुढे टाकून मोदींसमोर उभं ठाकणार हे मात्र तितकंच खरं आहे.

=====================================

First published: December 11, 2018, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading