कितीही मोठी किंमत चुकवावी लागेल तरी चालेल पण..,काँग्रेस नेत्याने दिला सेनेला इशारा

कितीही मोठी किंमत चुकवावी लागेल तरी चालेल पण..,काँग्रेस नेत्याने दिला सेनेला इशारा

महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे

  • Share this:

नांदेड, 16 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी कितीही मोठी किंमत चुकवावी लागेल तरी चालेल पण इंदिरा गांधींबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही, अशा शब्दात थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधानं केली आहेत. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रुत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

तसंच, महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असं आवाहनही चव्हाण यांनी केलं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेताच अवघ्या दोन तासांत संजय राऊत यांनी दिवंगत इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. याआधी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते.

संजय राऊतांची दिलगिरी..

इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होता. प्रभावशाली नेत्या, प्रखर राष्ट्राभिमानी नेत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती.

देवेंद्र फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संजय राऊतांच्या विषयावरून काँग्रेसवर प्रश्नांचा मारा केला आहे. इंदिरा गांधी मुंबईत का येत होत्या? अंडरवर्ल्डच्या मदतीने काँग्रेस निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी मसल पावरची गरज पडायची का? छोटा शकील, दाऊद इब्राहिम मुंबईचे पोलीस आयुक्त कोण हे ठरवत होते, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरणाची सुरुवात त्या कार्यकाळात सुरु झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजींनी यांनी दिली पाहिजेत. इंदिराजींसारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर आरोप होऊनही काँग्रेसचे का ? मुंबईवर हल्ला करणा-यांना काँग्रेसनं साथ दिली का? यावर काँग्रेस अधिकृत खुलासा का करत नाहीये अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली आहे.

Tags:
First Published: Jan 16, 2020 08:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading