मुंबई, 29 एप्रिल: केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, 45 वर्षांच्या नागरिकांचेच लसीकरण करण्यात अडथळे येत आहेत. राज्यातील विविध भागांत लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण ठप्प (vaccination paused) झाले आहे. यावरुनच आता काँग्रेस (Congress)ने मोदी सरकार (Modi Government)वर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टिका केली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "केंद्राला लसीकरण मोहिम केंद्रीभूत ठेवायची होती. पण 45 वर्षांवरील म्हणजे एकूण 20 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाचे नियोजनही केंद्राला जमले नाही. त्यामुळे 18 ते 44 वर्षाचा वयोगट म्हणजे एकूण 40 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाची घोषणा करताना ती जबाबदारी मात्र राज्यांवर ढकलली."
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटलं, "केंद्राकडून लस पुरवठ्यात सातत्याची हमी नसल्याने 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण लस उपलब्धतेनुसार करण्याचा निर्णय राज्याने काल घेतला. केंद्राने किमान 45 वर्षांवरील नागरिकांसाठी तरी वेळेवर व पुरेसा लस पुरवठा करावा. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभव असताना लस पुरवठ्यात दिरंगाई योग्य नाही."
मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद
मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पुढले तीन दिवस लसीकरण बंद राहील. पुढले तीन दिवस लसीचा साठा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला लसीकरण करता येणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला लस उपलब्ध व्हावी. लस मिळाली तर आम्ही शॉर्ट नोटीसवर लोकांना कळवू आणि लसीकरण सुरू करु.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, Corona vaccine, Coronavirus