पंढरपूर, 01 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा उपस्थितीत होते. परंतु, महापूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागले आणि ते मंदिरातून बाहेर पडले होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा पार पडली. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे पंढरपूरमध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपत्नीक मंगळवारी रात्री पंढरपुरात दाखल झाले होते. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थितीत होते.
#AshadhiEkadashi2020 अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आदित्य ठाकरे विठ्ठल मंदिरातून आले होते बाहेर pic.twitter.com/MVGgrF7p9L
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2020
पण काही वेळानंतर अचानक आदित्य यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पूजा अर्धवट सोडून आदित्य मंदिरातून बाहेर पडले. आदित्य ठाकरे मंदिरातून बाहेर आल्यामुळे सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली. आदित्य ठाकरे गाडीजवळ पोहोचले. अस्वस्थ वाटत असल्यामुळे आदित्य यांनी गाडीत पाणी घेतले. त्यानंतर बरं वाटू लागल्यामुळे आदित्य पुन्हा मंदिरात दाखल झाले आणि पुन्हा महापूजेत सहभागी झाले.
टिकटॉकवर बंदी! सरकारच्या निर्णयाविरोधात या महिला खासदाराने केला सवाल
दरम्यान, महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरींनी आखली मोठी योजना, देशभरातील प्रत्येक नागरिकाचा होईल फायदा!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
संपादन - सचिन साळवे