VIDEO झुंडशाहीच्या बळावर संमेलन वेठीला धरू नका - अरुणा ढेरे

VIDEO झुंडशाहीच्या बळावर संमेलन वेठीला धरू नका - अरुणा ढेरे

'आपलं लहानसहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, यासह अनेक कारणांनी हा उत्सव आपण भ्रष्ट होऊ दिला.'

  • Share this:

यवतमाळ, 11 जानेवारी : यवतमाळ इथं सुरू झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनराता सेहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेणं हा मुद्दा गाजत राहिला. अध्यक्षा अरुणा ढेरे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांनाच खडे बोल सुनावले. नयनतारा सहगल यांना न बोलावणं हे मराठी साहित्य विश्वासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

आज कुणीही येतो आणि साहित्य विश्वाला वेठीला धरतो हे खपवून घेता कामा नये असंही त्यांनी ठासून सांगितलं. या गोष्टींना केवळ सरकार जबाबदार नसून आपणच हा साहित्याचा उत्सव भ्रष्ट होऊ दिला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

अरुणाताईंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

  • साहित्य हा एक उत्सव असतो खरा, पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरुप गढूळ होऊ दिलं. आपलं दुर्लक्ष, आपला भाबडेपणा, आपली मर्यादित समज, आपलं लहानसहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, यासह अनेक कारणांनी हा उत्सव आपण भ्रष्ट होऊ दिला.

  • साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ही ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्या माझ्यावर आली आहे. कोणीही यावं आणि वाङ्मयबाह्य कारणांसाठी किंवा वाङ्ंमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावं असं आता आपण होऊ देता कामा नये. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तिगांभीर्यानं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली.

  • काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरुप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिलं. संमेलनाला वेठीला धरणाऱ्या, संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शून्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आपण बळी ठरलो.

  • संमेलनांमधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं. नयनतारा सहगल यांना याच कारणानं आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीनं त्यांना आमंत्रण दिलं होतं.

  • पण अत्यंत अनुचित पद्धतीनं आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रणच रद्द केलं. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेध करण्याची गोष्ट आहे यात शंका नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी अपमानजनक आणि आपल्यासाठी लाजीरवाणीच आहे. संयोजकांकडून ही गंभीर चूक घडली आहे यात शंकाच नाही.

  • संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत, सतत साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम पुरेशा समजशक्तीनं उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही. झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का?

  • पण तसं घडल्यामुळे केवळ संयोजन समितीच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading