महिनाभरात युतीचा निर्णय घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टीमेटम

महिनाभरात युतीचा निर्णय घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टीमेटम

जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, मुंबई 3 जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त पाच महिने राहिले आहेत. तर आचारसंहिता दोन महिन्यात लागू होईल. त्यामुळं युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीसाठी भाजपने शिवसेनेला वारंवार आवाहन केलं मात्र सेनेकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे जास्त वाट पाहायची नाही असं भाजपने ठरवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत शिवसेनेशी बोलणी करण्यास भाजप सकारात्मक आहे. विधानसभेत काही जास्त जागा देण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि सेनेत कटुता निर्माण झाली होती.

सत्तेत सहभागी होऊनही सेनेचं वागणं हे कायम विरोधी पक्षासारखच आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच त्यांनी स्वबळावर निवडणुक लढण्याची घोषणा केली होती.

मात्र गेल्या साडेचार वर्षात परिस्थिती बदलली आहे याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळे शिवसेनेची साथ भाजपला आवश्यक वाटते. तर शिवसेना शेवटपर्यंत ताणून धरण्याची शक्यता आहे. युती झाली तर त्याचा दोनही पक्षांना फायदा होईल आणि झाली नाही तर नुकसान होईल असं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मात्र शिवसेना चर्चेच्या मूडमध्ये नाही तर भाजप आग्रही आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस युतीसाठीचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

2009च्या  विधानसभा निवडणुकीत भाजपने 119 जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप 117 आणि शिवसेना 171असे जागांचे वाटप होत असे. नऊ आकडा युतीला लाभदायक असल्याने असे आकडे ठरले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी दहा-बारा जागा जास्त मागितल्या होत्या मात्र त्या शिवसेनेने न दिल्याने 25 वर्षांची युती तुटली होती.

 

First published: January 3, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading