मुंबई, 20 मार्च : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईतल्या मीरा रोड परिसरात भव्य असा दरबार पार पडला. या दरबाराच्या आयोजनापासून सुरू झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत महिलांचे मंगळसूत्र, गळ्यातील चेन याशिवाय इतर दागिने लंपास केले होते.स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 36 महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. धीरेंद्र शास्त्रींचे अनुयायी मोठ्या संख्येने दरबारात आले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला दरबार रात्री 9 वाजता संपला.
अंनिसची टीका
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मृल समिती अंनिसने हाच मुद्दा पकडून पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात काही भक्तांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार आहे. आता या बाबांनी पोलिसांना चोराचे पत्ते सांगावेत असं अंनिसने म्हटलं आहे.
अंनिसने नेमकं काय म्हटलं?
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईतल्या मीरा रोड परिसरात भव्य असा दरबार पार पडला. मात्र या दरबारात चोरीच्या घटना घडल्या. बाबाच्या दरबारामध्ये जे लोक येतात त्यांना बाबा त्यांच्या घरी कोणी चोरी केली? त्या चोराचे वर्णन सांगतात. आता बाबांनी पोलिसांना त्यांच्या दरबारात ज्यांनी चोरी केली त्या चोरांचा पत्ता सांगावा असं अनिसने म्हटलं आहे. एकीकडे लोक बाबाच्या दरबारामध्ये समस्या सोडवण्यासाठी आले होते. मात्र चोरीच्या घटनेमुळे त्यांची समस्या आणखी वाढल्याची टीका अनिसने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.