सुमित सोनवणे, दौंड, 26 जुलै : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असंही या पत्रात म्हटलं आहे.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एक ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.
विविध समाजघटकांकडून या मागणीबाबत जोर धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार कुल यांच्यासोबतच बहुजन लोकअभियान या संघटनेनंही अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 'अण्णाभाऊंनी बारा बलुतेदार आणि बहुजन समाजासह देशातील विविध घटकांसाठी काम केलेलं आहे. यापूर्वीच शासनानं त्यांच्या कामाची दखल घ्यायला हवी होती. आता विविध आमदार आणि खासदार याबाबत पत्र लिहून मागणी करत आहेत. त्यामुळे शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं,' अशी मागणी बहुजन लोकअभियान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आबा वाघमारे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP