राळेगणसिद्धी, 22 जानेवारी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही लोकपाल लागू न केल्याबद्दल केंद्र सरकारला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी धारेवर धरले. भ्रष्टाचार रोखणारा हा कायदा लागू करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी राफेल संबंधी कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
लोकपाल असते तर राफेल घोटाळा झाला नसता. राफेल संबंधी कागदपत्रे पूर्ण वाचल्यानंतर त्यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच देशावर हुकूमशाहीचं संकट येतंय की काय असं वाटत असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. 30 जानेवारीपासून केल्या जाणाऱ्या आमरण उपोषणाबद्दल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राफेलबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकपाल लागू केले असते तर राफेल घोटाळा झाला नसता. माझ्याजवळ राफेलशी संबंधीत कागदपत्रे आहेत. त्याचा अभ्यास केल्यानंतर आणखी एक पत्रकार परिषद घेईन. राफेल करारात एक महिना आधी सुरू केलेल्या कंपनीला कंत्राट कसं मिळालं? असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थीत केला आहे.
सरकारने लोकपाल कायदा संमत करण्याचे लिहून दिले आहे. शेतकऱ्यांना पेन्शम, आणि दीडपट जास्त किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते पण यातले काहीच केले नाही. आता यांच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
घटनात्नक दर्जा असलेल्या संस्थांचे आदेश न पाळणं हे देशाला लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जाणारे असल्याचे सांगत अण्णा हजारे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. सध्याचे सरकार असेच वागत असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला.
गेल्या 8 वर्षांत लोकपाल लागू करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे तिसऱ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. 2011 मध्ये पहिल्यांदा रामलीला मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री, लोकसभेसाठी 14 उमेदवारांचीही घोषणा