राळेगणसिद्धी, 5 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि इतर मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिलं. 'तुमच्या उपोषणासाठी शुभेच्छा,' असं उत्तर अण्णांच्या पत्रावर पंतप्रधान कार्यालयाने पाठवलं होतं.
पंतप्रधान कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद न आल्यानंतरही अण्णा आपल्या उपोषणावर कायम राहिले. सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतली. त्यानंतर सरकारच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अण्णांचं समाधान झालं नाही.
दिवसागणिक अण्णांची प्रकृती ढासळू लागली. त्यांचं वजनही कमी झाली. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाची धग वाढू लागली. राळेगणसिद्धीचे ग्रामस्थही आक्रमक झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशासन हादरलं. सुरुवातीला अण्णाच्या उपोषणाला थेट प्रतिसाद देण्याचं टाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नंतर मग अॅक्शन मोड आले.
उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस राळेगणसिद्धीत तब्बल सहा तास तळ ठोकून होते. त्यानंतर अण्णांना त्यांच्या मागण्यांबाबत समाधानी करण्यास मुख्यमंत्र्यांना यश आलं.
सुरूवातीला केवळ एका ओळीचं प्रत्युत्तर देत अण्णांच्या उपोषणाला गृहित धरणाऱ्या सरकारला नंतर मात्र त्यांची दखल घ्यावीच लागली. अण्णा आणि सरकारमधील या युद्धाला अखेर मंगळीवारी उशीरा पूर्णविराम मिळाला.
VIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री!