अमरावती, 07 जून: विडी न दिल्याने एका व्यक्तीने 60 वर्षीय वयोवृद्धाची रस्त्यावर डोकं आपटून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी युवकाने मध्यरात्री मृताच्या घरी जाऊन विडी मागितली होती, यामुळे दोघांत वाद झाला. यातूनच विडी न दिल्याचा राग अनावर झाल्याने आरोपीने 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचं डोकं रस्त्यावर आपटलं. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी युवकाला अटक केली आहे.
संबंधित 60 वर्षीय वृद्ध मृताचं नाव सुरेश तुकाराम रायबोले असून ते रहिमापूर येथील रहिवासी आहेत. तर खून केलेल्या आरोपीचं नाव बबलु ऊर्फ दिनेश गौतम खंडारे (वय-33) असं आहे. याप्रकरणी मृत सुरेश यांच्या पत्नी चंदा रायबोले यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास रहिमापूर पोलीस करत आहेत.
पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, 2 जून रोजी रात्री उशीरा आरोपी बबलु खंडारे मृत सुरेश रायबोले यांच्या घराच्या अंगणात आले होते. यावेळी त्यांनी मृत सुरेश यांना विडी मागितली. एवढ्या रात्री येऊन विडी मागितल्याने मृत सुरेश यांनी आरोपी बबलु खंडारे याला खडसावलं. यामुळे दोघांत वादाला सुरुवात झाली. दरम्यान राग अनावर झाल्याने आरोपी बबलु याने मृत सुरेश यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.
हे ही वाचा-लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना
विडी न दिल्याचा राग अनावर झाल्याने आरोपी बबलुने सुरेश यांचं डोकं रस्त्यावर आपटलं. यामुळे सुरेश रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. या घटनेनंतर त्यांना तातडीने अंजनगाव सुर्जी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान सुरेश यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृताच्या 50 वर्षीय पत्नी चंदा यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बबलु खंडारेला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Crime news, Murder