सातारा, 22 जानेवारी : साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका हस्तांतरणावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात 2017 मध्ये मोठा संघर्ष पेटला होता. या प्रकरणी अखेर सुनावणी पूर्ण झाली असून उदयनराजे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांची वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
आनेवाडी टोलनाक्याच्या हस्तांतराच्या मुद्यावरून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगल्यासमोर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. आनेवाडी टोलनाक्यावर जमावबंदीचे आदेश असताना देखील उदयनराजे आणि त्यांचे समर्थकानी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला होता.
आज याप्रकरणाची सुनावणी वाई कोर्टात पूर्ण झाली आहे. त्यानुसार, उदयनराजे आणि समर्थक वाई कोर्टात हजर झाले होते. आनेवाडी टोलनाका हस्तांतरण प्रकरणाचा काय निकाल लागणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, या प्रकरणी खासदार उदयनराजे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांची वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे.
टोल प्रकरणात शिवेंद्रराजे निर्दोष मुक्तता
दरम्यान, 11 जानेवारी रोजी आनेवाडी टोलनाक्यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसंच आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत होती. याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्याविरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.
या खटल्याची सुनावणी नुकतीच झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांची आज निर्दोष मुक्तता केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.