हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 08 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. चंद्रपूरमधील (Chandrapur) घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी निघाले होते, तितक्यात रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त थांबलेले पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सकाळी त्यांनी गोसीखुर्द धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कालव्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या बाजूला शेतकरी-प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती. ती पाहून खुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाडी थांबवली आणि उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गेली 35 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली, हजारो कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी मांडली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आज घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. घोडाझरी शाखा कालवा हा गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके(ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली ) येतात. यातील 19 गावात 2906 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती होणार आहे.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करा - उद्धव ठाकरे
दरम्यान, मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात विदर्भापासून केली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
'प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे', असंही मुख्यमंत्री म्हणाले.
गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. या बैठकीत गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी या जाणून घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.