बीड, 20 जून- 'तुझ्या घरात 22 किलो सोनं (गुप्त धन) आहे. वाईट आत्मा तुला ते सोनं मिळू देत नाही आहे. त्या आत्मासोबत माझे बोलणे होत आहे. तुला ते धन हवं असेल तर 40 बकरे आणि एका हरणाचा बळी दे,' असं म्हणत भोंदुगिरी करणार्या एका महिलेने 60 वर्षीय वृद्धेस सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने थेट पोलिसात तक्रार दिल्यानंतर भोंदुगिरी करणारी शेख नाझिया बेगम शेख पाशा (वय-35) या महिलेसह दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे.
काय आहे हे प्रकरण?
बीड तालुक्यातील कामखेडा येथील मन्ना बी ऊर्फ खालेदा बी सिराज शेख या 60 वर्षीय महिलेच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. तेलगाव नाका येथील महिला दारू सोडवत असल्याची माहिती एका महिलेने मन्ना बी यांना दिली. त्यावरून फिर्यादी मन्नाबाई हिने शेख नाझिया बेगम यांच्या घरी जावून आपल्या मुलाची दारू सोडविण्याबाबत विनंती केली. त्यावरून सदरील महिलेला बसून गोल रिंगन करत तिला लिंबू दिला. 'तुझ्या घरात वाईट आत्म्याचा प्रवेश झाला आहे. मी तुझ्या मुलाची दारू सोडविते. त्याचबरोबर तुझ्या घरातील वाईट आत्मा बाहेर काढते.' हा प्रकार तब्बल दीड महिना चालला. त्यानंतर काही दिवसांनी नाझियाने मन्ना बी हिस पुन्हा सांगितले की, 'तुझ्या घरात 22 किलो सोनं आहे, ते तुला हवं असेल तर त्यासाठी 40 बकरे व एका हरणाचा बळी द्यावा लागेल. सोबत मला सोने व काही नगदी पैसे आताच द्यावे लागतील.' असे म्हणत मन्ना बी हिच्याकडून वेळोवेळी नगदी पैसे उकळले. मात्र, मुलाची दारूही सुटली नाही आणि घरातील 22 किलो सोनेही मिळाले नाही. मात्र नाझियाचे पैसे उकळणे सुरुच होते. त्यामुळे वैतागलेल्या मन्ना बी हिने गेल्या दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अंधविश्वासाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नाजिया बेगम या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची आला आहे.
VIDEO: प्यार के दुश्मन! प्रेमीयुगुलाच्या आईंचा तुफान राडा