मुंबई, 6 मार्च : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर आपली स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून वेगळी ओळख अमृता फडणवीस यांनी निर्माण केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची EXCLUSIVE मुलाखत News18 Lokmat ने घेतली. राजकारणापासून ते कुटुंबापर्यंत आणि महिला सबलीकरणापासून ते गाण्यापर्यंत अनेक विषयांवरच्या प्रश्नांनी त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
संधी मिळाली तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, या प्रश्नाला अमृता यांनी नकारार्थी उत्तर दिलं. "मला मुळातच राजकारण आवडत नाही. मी राजकारणात उडी घेण्याची शक्यताच नाही", असं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात आपल्यापेक्षा बायकोचा पगार जास्त असल्याचं म्हटलं होतं. अमृता यांनीही हसत याला दुजोरा दिला. 'करिअर हा स्वतंत्र विषय आहे आणि देवेंद्र यांचाही माझ्या करिअरला आणि छंदांना पहिल्यापासून पाठिंबा होता. अजूनही आहे. त्यांच्या मुख्यमंत्री होण्याचा माझ्या नोकरी, करिअरशी, छंद तसा कुठलाच परिणाम झाला नाही', असं त्या म्हणाल्या.
आदित्य ठाकरे यांच्याशी सोशल मीडिया वॉर का?
'आपलं कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वैर नाही', असं त्यांनी सांगितलं. 'आदित्य यांनी महिलांवरच्या मुद्द्यावरून देवेंद्र यांना टारगेट केलं, म्हणून मला बोलावं लागलं. कारण देवेंद्र फडणवीस म्हणजे महिलांना सशक्त करणारा माणूस आहे. त्यांच्याविषयी असं कोणी बोलत असेल तर मला गप्प राहता येणारच नाही. मला ते सहनच होऊ शकत नाही. म्हणून मी त्यांना खोडून काढलं आणि मी अशा वक्तव्यांचा विरोध करणारच', असं त्या म्हणाल्या.
सोशल मीडियावर अमृता फडणवीस स्वतःला झाशीची राणी समजतात का?
सोशल मीडियावर व्यक्त व्हायला बंधन नाही, हे खरं. पण ती एक लढाईच आहे. मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्त होते, तेव्हा मला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. अनेक लोक माझ्या पोस्टवर, माझ्या मतावर अक्षरशः तुटून पडतात. मी अशा अनेकांचा सामना केला आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने येणार नवं गाणं
महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चला नवीन गाणं YouTube वर येत आहे. त्याविषयी अमृता फडणवीस भरभरून बोलल्या. अॅसिड अटॅक पीडितांना हे गाणं समर्पित आहे, असं त्यांनी सांगितलं.
गुन्हेगारांना जाहीरपणे फाशी द्या
स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. "निर्भयाच्या गुन्हेगारांना जाहीर फाशी द्यायला हवी ", असं माझं मत आहे", असं त्या म्हणाल्या.
सविस्तर मुलाखत आणि VIDEO लवकरच News18 Lokmat वेबसाइटवर प्रसिद्ध होईल.
अन्य बातम्यासंजय राऊत म्हणाले, रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीअमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.