• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • वाझे प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचीही उडी, शिवसेनेला लगावला सणसणीत टोला

वाझे प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचीही उडी, शिवसेनेला लगावला सणसणीत टोला

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही बोचरा सवाल करत सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मार्च : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक हा सध्या राज्यभर चर्चिला जाणारा विषय आहे. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासेही होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची अडचण झाल्याचं बोललं जात आहे. भाजपनेही (BJP) या मुद्द्यावरून जोरकसपणे ठाकरे सरकारला घेरलं आहे. अशातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही बोचरा सवाल करत सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'कोण कोणास म्हणाले - व्यवहार माझे, जबाबदार वाझे! सांगा पाहू...', असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी तिरकसपणे राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे आणि शिवसेनेवरील आरोप मुंबईत सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा संशयित मृत्यू याप्रकरणी ज्यांना अटक झाली त्या सचिन वाझे यांचे शिवसेनेसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचाच उल्लेख केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले. 'वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता,' असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. 'शिवसेनेसोबत सचिन वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचं काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
  Published by:Akshay Shitole
  First published: