मुंबई, 1 मे : महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'हम एक दूसरे से जात, धर्म , पर लड़ते रह गए - नक्सल आए और हमारे 16 रक्षक ले गए ! भावपूर्ण श्रद्धांजली,' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.
कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.
गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते. त्यातल्या 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर जखमी आहेत.
या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी(30 एप्रिल) रात्री 11 ते 3 वाजण्याच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं आहे.पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली आहेत. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट