चंदीगढ, 13 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील विविध उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. महसूल कमी झाल्याने सरकारलाही मोठा फटका बसला आहे. फक्त जीवनावश्य वस्तूंची दुकाने उघडी असल्याने मद्यविक्री आणि त्यातून मिळणार महसूल बंद झाला. मात्र आता पंजाब सरकारने पंजाबमध्ये दारूची दुकाने उघडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल आहे.
पंजाब सरकारच्या आर्थिक स्थितीचा विचार करता दारूची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय आज घेतला जाऊ शकतो. लॉकडाऊनमुळे पंजाबच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आगामी 15 एप्रिलपासून पंजाबमध्ये दारूची दुकाने उघडण्याच्या तयारीला सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. मद्याची दुकाने दररोज 3 ते 4 तास उघडतील. आज मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देऊ शकतात.
दुसरीकडे, आसाममध्ये 13 एप्रिलपासून दारुची किरकोळ विक्रिची दुकाने सुरू होतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. प्रत्येक दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या तळीरामांना आता आसाम सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर कोरोना आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारच्या तिजोरीत दोन पैसे जमा होणार आहेत.
महाराष्ट्रात काय होणार?
केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन सुरू करण्याआधीच महाराष्ट्रात राज्य सरकारने संचारबंदीची घोषणा केली होती. जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच सरकारचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणा घटलं आहे. एकीकडे कोरोनासारख्या भयंकर आव्हानाविरुद्ध लढत असताना राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. अशा स्थितीत राज्यातील महसूल वाढवण्यासाठी काही पाऊलं उचलली जाऊ शकतात. मात्र दारूची दुकाने सुरू करण्याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.