अमरावती, 3 फेब्रुवारी : अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अखेर त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष होतं, त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कोणाला किती मतं?
अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल हाती येण्यास विलंब झाला. तब्बल तीस तास चाललेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला. धीरज लिंगाडे यांना एकूण 46344 मतं पडली, तर भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांना 42962 मत मिळाली. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे.
तब्बल तीस तासानंतर निकाल
काल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. त्यापैकी औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक मतदारसंघाचा निकाल रात्री उशीरा हाती आला. तर अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू होती. अखेर आज निकाल हाती आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली आहे.
मविआचा भाजपला धक्का
या निवडणुकांमध्ये मविआने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूर, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.