अमरावती, 27 मे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळानं दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसला जर राज्यात वाचवायचं असेल तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी हायकमांडकडे केल्याचं वृत्त आहे. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आपण दिल्लीला गेलो होतो, मात्र ती सदिच्छा भेट होती असं त्यांनी म्हटलं आहे. आता या सर्व प्रकरणावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांना टोला लगावला आहे. प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचं राज्यातील सर्वोच्च पद असतं, त्यामुळे त्याबाबत आपल्याला बोलायचं नाही. मात्र एवढं नक्की की सर्वांनी मिळवून मिसळून कामं केलं तर पक्षाची कामगिरी अधिक चांगली होईल, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी पटोलेंचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
पटोलेंविरोधात राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये खदखद?
दोन दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेऊन, पटोलेंविरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं. यापूर्वी देखील एकदा राज्यातील काँग्रेसच्या एका शिष्ठमंडळानं हायकमांडची भेट घेत पटोलेंविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole, Rahul gandhi, Yashomati thakur