अमरावती, 2 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता असून भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.
'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे,' असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
'विचार जमतं नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा,' असा सल्लाही खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
दरम्यान, औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली. 'आमच्यासाठी लोकांचा विकास महत्त्वाचा असून नाव बदल्याने विकास होत नाही,' असं थोरात म्हणाले.
काँग्रेसने नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडत टीकास्त्र सोडलं. त्यानंतर शिवसेनेनं पलटवार करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकंदरीतच या मुद्द्यावरून पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार, हे मात्र स्पष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Uddhav thackeray