मुंबई, 26 जून : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. राष्ट्रवादीला केवळ सातारा, बारामती, रायगड आणि शिरुर या चारच जागा जिंकता आल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा कौर यांनी बाजी मारली. पण आता याच नवनीत राणा कौर navneet rana kaur भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने नवनीत राणा कौर यांना विजय खेचून आणणं सहज शक्य झालं. पण नवनीत राणा कौर यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. रवी राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर नवनीत कौर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, विदर्भात यंदा अमरावती मतदारसंघातली निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा कौर यांना पाठिंबा दिला होता. कौर यांनी या निवडणुकीत युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्यांनी हे यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.
नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही त्यांनी आपल्या मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही. त्यांनी सातत्याने संपर्क तर ठेवलाच त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी त्या धावूनही गेल्या. त्यामुळे मतदारांनी त्यांना यावेळी संधी दिली.
गेल्या पाच वर्षात त्यांनी 1 हजार 750 गावांना भेटी दिल्या. तसंच अडीच लाख महिलांशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं जातं. गेल्या पाच वर्षात नवनीत कौर राणा यांनी किमान दोन लाख महिलांशी सेल्फी काढला असंही सांगितलं जाते. नवनीत या तेलुगू अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे.
कौर यांच्याविषयी महिलांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षणाची भावना होती. तब्बल 1 लाख महिलांचं मतदान त्यांना झालं असंही आता सांगितलं जात आहे. अमरावती हा संमिश्र मतदारसंघ आहे. अमरावती सारखा शहरी भाग तर मेळघाटासारखा आदिवासी भागही त्यात आहे. त्यांच्या कामामुळेच अमरावतीत वंचित फॅक्टर आणि मोदी फॅक्टरही चालला नाही. दलित, आदिवासी आणि मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतं दिली असंही आता स्पष्ट झालंय.
शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्याविषयी कमालीची नाराजीची भावना होती. त्याचा फायदाही नवनीत कौर यांना मिळाला आणि निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य