Home /News /maharashtra /

Why I Killed Gandhi : 'एक कलाकार म्हणून मला त्यावेळी गरज होती', अमोल कोल्हेंनी खरं कारण सांगितलं

Why I Killed Gandhi : 'एक कलाकार म्हणून मला त्यावेळी गरज होती', अमोल कोल्हेंनी खरं कारण सांगितलं

"कलाक्षेत्राच्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर मला राजा शिवछत्रपती मालिका मिळाली. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली. पण ही मालिका संपल्यानंतर काय? हा प्रश्न एक कलाकार म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात होता", असं अमोल कोल्हे म्हणाले.

    मुंबई, 21 जानेवारी : नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन चौफेर टीका झाल्यानंतर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज दुसऱ्यांदा खुलासा केला आहे. आजच्या खुलाशात आपण त्यावेळेस आपण कोणत्या परिस्थितीत ही भूमिका स्वीकारावी लागली याचं कारण सांगितलं आहे. पण यावेळी त्यांनी भूमिका मांडताना याआधी वापरलेला आव्हानात्मक भूमिकेचा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यांनी या सगळ्या वादावार सामोपचाराने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. "मला 2017 साली हिंदी चित्रपटातून ऑफर आली होती. त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी कलाकार म्हणून माझ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे मी कलाकार म्हणून शोधत असलेली ओळख, त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका आणि चित्रपट करण्यात तब्बल आठ वर्ष येत असणारं अपयश, त्या अपयशाने मिळालेली एक संधी आणि दुर्देवाने अचानक अकरा दिवसात बंद झालेलं त्याचं चित्रिकरण, त्यामुळे कलाकार म्हणून एक नैराश्य होतं. एक ओपनिंगची गरज होती. त्यावेळी एक हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका करण्याची संधी चालून आली. जरी ती विचारधारेशी जुळत नसली तरीसुद्धा एक कलाकार म्हणून माझी त्यावेळची गरज होती", असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. अमोल कोल्हे आणखी काय म्हणाले? "मी कधीही वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात नथुराम गोडसेचं किंवा महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही. तसं मी कधी करणारही नाही. मी आज सार्वजनिक जीवनात असताना या गोष्टीचा संदर्भ दिला जातोय. पण या चित्रपटाचं चित्रिकरण हे 2017 साली झालं आहे. कलाकार म्हणून एक बाजू मांडणं गरजेचं आहे. ही बाजू प्रत्येकाला पटली पाहिजे, असा माझा आग्रह नाही. पण ते कारण समोर येणं देखील तितकंच गरजेचं आहे. कलाक्षेत्राच्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर मला राजा शिवछत्रपती मालिका मिळाली. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली. पण ही मालिका संपल्यानंतर काय? हा प्रश्न एक कलाकार म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात होता. या मालिकेच्या निमित्ताने जे शंभूराजे नाटक बंद झालं होतं ते नाटक मी पुन्हा सुरु केलं. त्यानंतर कलर्स हिंदीवर वीर शिवाजी ही मालिका सुरु केली. पण दुर्देवाने ती मालिका अर्ध्यावरच बंद करावी लागली. एक सातत्याने प्रश्न निर्माण होत होता. इंडस्ट्रितही कुजबुज सुरु होती की, अमोल कोल्हेला आता पुढची भूमिका मिळणार की नाही? त्यानंतर अनेक प्रयत्नही केले. ऑन ड्यूटी 24 तास सारखा चित्रपट केला. रंगकर्मी, मराठी टायगर्स सारखे सिनेमे केला. पण कलाकार म्हणून राजा शिवछत्रपती सारखं यश मिळालं नाही", असं कोल्हे म्हणाले. (दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं; एक रामटेक तर भंडाऱ्यात आढळला दुसरा मृतदेह) "छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारण्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु होती. त्यासाठी जंगजंग पछाडलं होतं. अनेक वाहिन्या, निर्मात्यांना विनंती केली होती. त्यानंतर एका वाहिनीने ही संधी दिली. ही संधी दिल्यानंतर साताऱ्याच्या माहुलीमध्ये याचं चित्रिकरण झालं होतं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रिकरणाचा मुहुर्त झाला होता. पण अकरा दिवसांचं चित्रिकरण झाल्यानंतर वाहिनीने सदर मालिका आपण प्रक्षेपित करणार नसल्याचं सांगितलं. हा खरंतर माझ्यासाठी कलाकार म्हणून खूप मोठा धक्का होता. संभाजी महाराजांची मालिका करण्यासाठी कुणीही तयार होत नाही म्हणून आपणच स्वत:च्या निर्मिती संस्थेद्वारे निर्मिती करायची. पण अचानक मालिकेने नाही म्हटलं होतं. राजा शिवछत्रपती मालिकानंतर एक महत्त्वाची भूमिका करण्याची जी इच्छा आणि प्रयत्न होता त्याला खीळ बसली होती. त्याचदरम्यान माझ्यासमोर एक हिंदी चित्रपटाची संधी आली", अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या