मनाली पवार, प्रतिनिधी
मुंबई, 13 जून : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्य़ानंतर आता राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रोहित पवारांची भेट घेतली आहे. गुरुवारी अमित ठाकरे आणि रोहित पवार यांच्या एका हॉटेलमध्ये अर्धा तास भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. अशाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज एकमेकांसोबत लंच केला आहे.
सव्वा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती, त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण त्यांच्या या भेटीमागे राजकीय चर्चांणा वेगळं वळण लागलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी सभा घेत भाजप सडकून टीका केली. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत हजरी लावली.
दरम्यान, बुधवारी अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचं अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.
VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी