महेश तिवारी, गडचिरोली,7 एप्रिल : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी रविवार 7 एप्रिल रोजी गडचिरोलीत येथे सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर अमित शहा यांचा गडचिरोली दौरा रद्द झाला. त्यामुळे राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मात्र अमित शहा गडचिरोली येथे न आल्याने सभेला गर्दी केलेले शेकडो नागरिक हिरमुसल्या चेहऱ्याने घरवापसी करताना दिसून आले.
अमित शाह यांचे ओरिसात आज तीन कार्यक्रम झाले. तेथे नियोजनापेक्षा अधिक वेळ लागला. नागपूरला पोहचण्यास सायंकाळचे 6 वाजतील अशी स्थिती झाली. नंतर सूर्यास्तामुळे हेलिकॉप्टर वापरणे अशक्य असल्याने त्यांना चंद्रपूर, गडचिरोली सभांना जाता आले नाही अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
नरेंद्र मोदी 26 एप्रिलला अर्ज भरणार
पंतप्रधान मोदी 26 एप्रिल रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 25 तारखेलाच मोदी वाराणसीत दाखल होतील. उमेदवारी अर्ज भरताना ते भव्य रोड शोही करणार आहेत. 2014 च्या साली मोदी वाराणसीतून निवडून आले होते. या निवडणुकीतही पंतप्रधान दोन जागांवरून लढतील असं बोललं जात होतं मात्र ते दोन जागांवरून न लढता फक्त वाराणशीतूनच लढणार आहे.
2014 च्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेला रोड शो चांगलाच गाजला होता. त्याची चर्चाही देशभर झाली होती.
38 देशांमध्ये प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक
‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या सिनेमाबद्दल नानाविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी सिनेमाची टीम बायोपिक एक दोन नव्हे तर तब्बल ३८ देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात यूएस, यूके, कनाडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमात मोदींच्या बालपणापासून पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
सिनेमाचे निर्माते आणि वितरकांपैकी एक निर्माते आनंद पंडित यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातील अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळेच आम्ही फक्त भारतात नाही तर जगभरात ३८ देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.’