Success Story : अमेरिकेच्या हार्ले डेव्हिडसनला 'सोलापुरी टच'

Success Story : अमेरिकेच्या हार्ले डेव्हिडसनला 'सोलापुरी टच'

हार्ले डेव्हिडसनची बाईक घेणे हे भारतातील हजारो तरुणांचे स्वप्न असते. मात्र, सोलापुरातील एका युवकाने हार्ले डेव्हिडसनची बाईक डिझाईन करुन तरुणाईपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 19 डिसेंबर : आप्पा, दादांचे शहर अशी सोलापूरची एकेकाळची साधारण ओळख. नोकरीसाठी पुण्या-मुंबईला गेल्यावर सोलापूरचा आहे असे सांगितले की, नोकरी हमखास नाकारली जायची. हा अनुभव अनेक सोलापूरकरांनी घेतलेला आहे. मात्र, आता सोलापूरची 'ती' ओळख बदलली आहे. हार्ले डेव्हिडसनची बाईक घेणे हे भारतातील हजारो तरुणांचे स्वप्न असते. मात्र, सोलापुरातील एका युवकाने हार्ले डेव्हिडसनची बाईक डिझाईन करुन तरुणाईपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. चेतन शेडजाळे असं या सोलापुरी तरुणाचे नाव आहे. पाहुयात या सोलापुरी मुद्रेची छाप हार्ले डेव्हिडसन या जगविख्यात मोटार सायकलच्या ब्रॅन्डवर कशी उमटली.

साधारणपणे सोलापूरकर हे गल्लीच्या बाहेर पडून आपला विकास साधण्याच्या विचारात फारसे नसतात. आपल्या शहरातच आपली नोकरी आणि छोकरी त्यांना हवी असते. मात्र याला छेद देत एका सर्वसामान्य पण स्वाभिमानी शेडजाळे कुटुंबातील चेतनने आपली मुद्रा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे. सोलापुरातील बाळीवेस परिसरातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील शेडजाळे कुटुंबीय तसे कलेच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी. चन्नप्पा शेडजाळे हे प्रसिद्ध पेंटर होते. मात्र, पुढील पिढीने आपला व्यवसाय सोडून वेगेवेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमावले. त्यातीलच चेतन यांनी देखील कलेशी निगडीत मात्र तंत्रज्ञानाशी जवळीक साधणाऱ्या आर्किटेक्चर क्षेत्रात आपल्या वाटा शोधल्या. वडील सुहास शेडजाळे हे पेशाने शिक्षक असल्याने घरची परिस्थिती तशी मध्यवर्गीयच होती. त्यामुळे वडिलांनी आर्किटेक्चर करण्यास समर्थता दर्शवली. चेतन यांनी श्राविकाश्रम इंग्लिश मीडियम मधून माध्यमिक तर जैन गुरुकूलमधून उच्च-माध्यमिकचे शिक्षण घेतले. पुढे सिद्धेश्वर आर्किटेक्चर कॉलेजमधून पदवी संपादन करुन त्यांनी बेंगलोरला आपला मोर्चा वळवला. तिथे प्रोफेशनल प्रॅक्टीस करत असतानाच त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला पगार मिळाला. मात्र, त्यांचे मन तिथे रमत नव्हते. त्यांना आणखी काहीतरी मोठे करायचे होते. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा इटालीला वळवला.

चेतन यांना लहानपणापासूनच बाईक, कार यामध्ये रुची होती. इटलीत त्यांना मिलानमध्ये कार ॲन्ड ट्रान्सपोर्टेशन डिझाईनचा कोर्स करण्याचे ठरवले. इटली हे डिझाईनचे माहेरघर मानले जाते. मात्र, त्याचवेळी अहमदाबादच्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर डिझाईनच्या एंट्रन्समध्ये चेतन टॉप टेन मध्ये होते. परंतु, वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून त्यांना जगायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी इटलीला जाण्याचे निश्चित केले. मात्र, त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. त्यासाठी वडिलांनी शैक्षणिक कर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवले मात्र बॅंकेने कर्ज दिलेच नाही. अखेरीस आयुष्यभर केलेल्या कष्टाची पुंजी म्हणजेच पीएफचे १३ लाख रुपये वडिलांनी चेतनच्या परदेशी शिक्षणासाठी दिले.

त्याची जाणीव मनाशी बाळगून २००३ साली चेतन यांनी २३ व्या वर्षी इटलीत आपले शिक्षण सुरू केले. सुरुवातीला इटलीतील भाषा, खान - पान, सगळेच वेगळे होते. त्यामुळे मनात भिती होती. शिवाय तेथील भाषाही कळत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला चेतन गांगरुन गेले. मात्र, वडिलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि अवघ्या तीन महिन्यात इटालीयन भाषा आत्मसात केली. नाविन्याचा शोध आणि बोध ही वृत्तीच कदाचित चेतन यांच्या यशाचे रहस्य असावी.

पुस्तकी शिक्षण पुर्ण केल्यानंतर मात्र त्यांनी लगेचच नोकरी सुरू केली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री झाली ती जॉन सालामिनी या हरहुन्नरी मित्राशी. चेतन यांचे काम पाहून त्यांना प्रचंड मदत केली. जॉन यांच्यामुळेच चेतन यांचे काम आणखी उठून दिसू लागल्याचे ते नम्रपणे सांगतात.

 डिझाईनच्या क्षेत्रातील 'देवाचा कॉल'

इटलीत चेतन यांच्या कामाची हळूहळू चर्चा होऊ लागली होती. मात्र, गरज होती ती एका चांगल्या संधीची. कारण नाव होत होते मात्र आर्थिक परिस्थिती अद्याप नाजूकच होती. अचानक एकेदिवशी चेतन यांना डिझाईन क्षेत्रातील देवाचा कॉल आला. होय देवाचाच कॉल. कारण, मासिमो तंबुरिनी यांना मोटार सायकल डिझाईन क्षेत्रातील देव मानले जाते. चेतन यांचे काम त्यांना भावले होते. त्यामुळेच त्यांनी चेतन यांना मुलाखतीसाठी स्वतः कॉल करुन बोलावले होते. पुढे साडे पाच वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन यांनी काम केल्याने त्यांच्या कलेला झळाळी प्राप्त झाली होती. याकाळात त्यांनी दोन बाईकचे पेटंट मिळवले. मासिमो यांनी मला केवळ डिझाईनच नव्हे तर त्यासोबत नम्रतादेखील शिकवली असल्याचे ते भावूक होऊन सांगतात.

पुढे २००९ - १० या सालात चेतन यांनी स्वतःची डिझाईन कंपनी सुरू केली. त्याद्वारे ते विविध कंपन्यांना कन्सलटिंग करत. सुरुवातीला बीएमडब्ल्यू, होस्क वॉर्ना या जगप्रसिद्ध ब्रॅन्डला कन्सलटिंग करू लागले.

 जगविख्यात कंपनीची ऑफर

इटलीच्या मिलानमध्ये एकदा दुचाकी गाड्यांचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनात हार्ले डेव्हिडसनचे विलीजी डेव्हिडसन आले होते. त्यांनी चेतन यांचे काम पाहिले. त्यानंतर कालांतराने त्यांनी चेतन यांना हार्ले डेव्हिडसन मध्ये काम करण्याची ऑफर दिली. ११५ वर्षे जगातील बाईकर्सच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  हार्ले कंपनीने चेतन यांना दिलेली ऑफर म्हणजे शेडजाळे कुटुंबाच्याच नव्हे तर संपूर्ण सोलापूरकरांच्या अभिमानाचा क्षणच म्हणावा लागेल. पुढे २१ संचालकांच्या मंडळापुढे ४ ते ५ दिवस त्यांची मुलाखत चालली आणि त्यांची निवड झाली.

केवळ नोकरी नव्हे तर निर्मिती हेच ध्येय

      

चेतन मागील आठ वर्षापासून हार्ले डेव्हिडसन या जगप्रसिद्ध ब्रॅन्ड सोबत काम करत आहेत. या आठ वर्षात त्यांनी केलेले काम केवळ उल्लेखनीय नसून मैलाचा दगड बनले आहे. इंजिन हे हार्लेचे हार्ट आहे आणि तेच हार्ट चेतन यांनी बनवलेले आहे. चेतन यांच्या नावावर हार्ले डेव्हिडसनच्या स्ट्रीट ७५० आणि मिल्वॉकी - ८ या बाईक्सच्या इंजिनचे पेटंट आहे. याशिवाय मिल्वॉकी-८ च्या इंजिनवरील कव्हर, त्याचे सिलेंडर, लगेज रॅक, अशी एकूण पाच पेटंट त्यांच्या नावावर आहेत.

विशेष म्हणजे स्ट्रीट रॉड ७५० ही हार्लेची स्पोर्ट रिलेटेड बाईक आहे. ती हार्ले डेव्हिडसनचा मुखवटा बदलवण्याचा प्रयत्न करत आहे. हार्लेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रीट फायटर-९७५ ही बाईक लॉंच होण्याच्या मार्गावर आहे. या बाईकचे सुंदर दिसण्याचे काम चेतन यांच्याकडे आहे. हार्ले डेव्हिडसनच्या ११५ वर्षाच्या इतिहासात एका भारतियाने केलेले हे काम थक्क करणारे आहे.

चेतन यांचे ध्येय

सोलापूरसाठी खूप काही करायचे आहे. आपल्या गावात काहीतरी उत्तम असे आणायचे आहे. जेणेकरून सोलापुरातील युवक युवतींनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवाह समजून घेत आपला स्वतःचा विकास साधता येईल.

पालक आणि पाल्ल्यांना सल्ला  

आई- वडिलांनी आपल्या मुलांना इमोशनल सपोर्ट करावा. मुलांचे करिअर मुलांना निवडू द्यावे. कोणतेही काम वाईट नसते मात्र, ते आपण कसे करतो यावर त्याचे यश अवलंबून असते. आज पालक आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, एखाद्या शहरात एवढ्या डॉक्टर- इंजिनिअरची गरज भासणार आहे का? त्यामुळे पालकांनी वेगळ्या करियरसाठी आपल्या मुलांना प्रवृत्त करावे.

इतर आवडी

चेतन यांना फर्निचर बनविण्याचीही प्रचंड आवड आहे. ते आपल्या मित्रांना त्यांच्या लिविंग रुम, ऑफिसचे फर्निचर डिझाईन करुन बनवून देतात. इतकेच काय तर त्यांनी स्वतःची रुम देखील स्वतः डिझाईन करुन बनवली आहे. याशिवाय त्यांना भाषा शिकण्यातही रस आहे. आजवर त्यांनी मराठी, कन्नड, हिंदी, गुजराती, इटालियन, स्पॅनिश आदी भाषा आत्मसात केल्या आहेत. परदेशातील हिंदु मंदिरात जाऊन श्रमदान करण्याची देखील त्यांना आवड आहे.

First published: December 19, 2019, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading