असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये! 4 वर्षाच्या चिमुकल्याने क्षणात सोडले प्राण

असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये! 4 वर्षाच्या चिमुकल्याने क्षणात सोडले प्राण

अंबरनाथमधील (Ambernath) एका 4 वर्षीय चिमुकल्यासोबत काहीसा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

  • Share this:

अंबरनाथ, 7 मार्च : मृत्यू कुणाला आणि कधी गाठेल याचा नेम नसतो, असं म्हटलं जातं. असाच काहीसा दुर्दैवी प्रकार अंबरनाथमधील (Ambernath) एका 4 वर्षीय चिमुकल्यासोबत घडला आहे. मित्रांसोबत खेळत असताना सलाउद्दीन शेख याचा ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाला आहे. अंबरनाथ पश्चिमच्या बुवापाडा खडी मशीन भागात हा प्रकार घडला आहे.

सलाउद्दीन शेख हा शनिवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत खेळत होता. याच वेळी खडी मशीन भागातील काम सुरू असताना जेसीबी चालकाने (JCB driver) ग्रीडचा ढिगारा टाकला. मात्र हा ढिगारा सलाउद्दीनच्या अंगावर पडला. ढिगारा इतका मोठा होता की ढिगाऱ्याखालून त्याला बाहेर निघताच आले नाही. त्यामुळे गुदमरून त्यात त्याचा मृत्यू झाला.

सलाउद्दीन सोबत खेळणाऱ्या त्याच्या मित्राने ही सगळी घटना डोळ्याने पाहिली. मात्र तो घाबरल्याने त्याने याबाबत कोणालाच सांगितलं नाही. त्याने ही घटना सांगितली असती तर या चिमुरड्याचा जीव वाचला असता. मात्र जेसीबी चालकाने रेती (ग्रीड) टाकताना लक्ष का दिले नाही? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जेसीबी चालकाचा निष्काळजीपणा आणि खडी मशीन भागात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत नसल्याने प्रकार घडला आहे. त्यामुळे खडी मशीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा चिमुरडा काल सायंकाळपासून खेळत असताना बेपत्ता झाला होता. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सकाळी त्याचा शोध घेत असताना रेती (ग्रीड)चा ढिगारा बाजूला करण्यात आला आणि सलाउद्दीनचा मृतदेह त्या ढिगाऱ्याखाली आढळला. तर या कुटुंबाला मालकाने आर्थिक मदत करण्याची मागणी देखील चिमुरड्याच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे सलाउद्दीन राहत असलेल्या बुवापाडा भागात शोककळा पसरली आहे. आता चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अवहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे.

दरम्यान, अंबरनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत. खडी मशीनचा प्रोजेक्ट असलेली जागा ही वन विभागाची असून रीतसर या जागेवर परवानगी घेऊन प्रोजेक्ट उभारला आहे. कोणी आत येऊ नये म्हणून संरक्षक भिंत देखील उभारली होती. मात्र ती इथल्या लोकांनीच पाडली असल्याचा दावा या खडी मशीनचे मालक विपुल सावळा यांनी केला आहे.

या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी आता विपुल यांचा जवाब घेण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावले आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने खडी मशीन आणि खदान भागात अनेक दुर्घटना होत असल्याचे समोर आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 7, 2021, 5:42 PM IST

ताज्या बातम्या