शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी, 12 जानेवारी : पोलादपुर -आंबेनळी घाटातील दापोली कोकण कृषी विद्यापीठ बस अपघात प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी मृत बसचालक प्रशांत भांबेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे नातेवाईकांनी आक्षेप घेत उपोषणाचा इशारा दिला आहे.
28 जुलै 2018 ला पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला होता. या अपघातात 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी 5 महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज दापोलीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशांत भांबेड यांच्यावर पोलादपूर पोलिसात दाखल गुन्हा झाल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रशांत भांबेड यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, या अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
तसंच प्रकाश देसाईंवर गुन्हा दाखल करावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
प्रशांतवरील गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहे, असंही या बैठकीत ठरलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
28 जुलै रोजी सकाळी साडे 10 च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील 29 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणा-या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली.
मात्र, नंतर हेच प्रकाश सावंत संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. कारण मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश सावंत हेच गाडी चालवत होते आणि अपघात होताना त्यांना लक्षात आले असता त्यांनी गाडीतून उडी टाकली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता.
मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल प्रश्न
बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?
ते नेमके कुठे बसले होते?
ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?
शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?
प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?
===============================================