शिवाजी गोऱ्हे दापोली, 12 आॅक्टोबर : 29 जणांना मृत्यूच्या कवेत घेऊन ८०० फूट खोल दरीत झेपावलेली बस बाहेर काढण्यात आली. मात्र, ज्या उद्देशासाठी ही बस बाहेर काढण्यात आली होती. तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आंबेनळी घाटात अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होता याचे गूढ मात्र अधिक वाढले आहे.
28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव आश्चर्यकारक बचावले होते.
दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ही बस ६ आॅक्टोबर रोजी दरीतून बाहेर काढण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्याच्या मदतीने बस काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. तब्बल 7 तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने बस काढण्यात आली. बस दरीत अडकल्यामुळे पोलिसांचा तपास पूर्ण होत नव्हता. तसंच एस टी परिवहन खात्याचा तपास अपूर्ण राहिला होता.
आज ही बस दापोली विद्यापीठात आणण्यात आली आणि विद्यापीठाच्याच गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवतं होतं ? या दृष्टीने तपास सुरू होता.
अपघातग्रस्त बसच्या गिअर आणि स्टेरींगवर ठसे सापडले तर नेमकं कोण बस चालवत होतं याचा शोध लागला असता असा तपास यंत्रणेला कयास होता. पण सव्वा दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागले नाही.
बसच्या स्टेरींग आणि गिअरवर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. साहजिक सव्वा दोन महिन्याच्या अवधीनंतर बस बाहेर काढल्यानंतर हाताचे ठसे मिळतील का अशी शक्यताही धुसर होती. पण एक छोटी आशा बाळगूण घटनेचा गूढ उकलण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे तपास यंत्रणांचे पदरी निराशा आलीये.
त्यामुळे अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होतं याचे गूढ मात्र अधिक वाढले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
============================================
PHOTOS : 29 जणांचा मृत्यू झालेली बस काढली दरीतून बाहेर