जिल्हा परिषदांवर कुणी मारली बाजी? ग्रामीण भागात भाजपसाठी धोक्याची घंटा

जिल्हा परिषदांवर कुणी मारली बाजी? ग्रामीण भागात भाजपसाठी धोक्याची घंटा

राज्याची मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचा धुरळा उडालाय. जिल्हा परिषदेच्या निकालातून भाजपची पुढील वाट बिकट असल्याचे संकेत मिळाले.

  • Share this:

नागपूर, 8 जानेवारी : राज्याची मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचा धुरळा उडालाय. जिल्हा परिषदेच्या  निकालातून  भाजपची पुढील वाट बिकट असल्याचे संकेत मिळाले. 6 जिल्हा परिषदांपैकी केवळ एका जिल्हा परिषदेवर भाजपचा विजय झालाय तर 4 जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं यश मिळवलं. त्यामुळे ग्रामीण भागातून भाजपसाठी धोक्याची घंटा निर्माण झालीय.  भाजपला पुन्हा ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावं लागणार आहे हेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानं दाखवून दिलं.

फडणवीस , गडकरींना धक्का

भाजप पक्षाची ओळख शहरी पक्ष अशी आहे.  मात्र ही ओळख पुसत गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपनं चांगलं यश मिळवलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्याकडे खास लक्ष दिलं होतं. मात्र राज्यातून भाजपचं सरकार हद्दपार झालं. मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळे राज्यातील सत्तेची गणितं पार बदलून गेली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आलं. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला सर्व स्तरातील सत्तेपासून हद्दपार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत.

महाविकास आघाडीला यश

जिल्हा परिषद निवडणुकीत तर महाविकास आघाडीनं भाजपला चांगलाच दणका दिला. विदर्भातीत पाच जिल्हा परिषदेपैकी चार जिल्हा परिषदेवर भाजपची धुळधाण झाली... एकूण जागांपैकी भाजपला सर्वाधिक म्हणजे 143 जागा मिळाल्या मात्र तरीही भाजपचा पराभव झाला. भाजपला केवळ धुळे जिल्हा परिषद राखण्यात यश आलं.  तर त्या खालोखाल काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 75 जागा जिंकल्या. तर शिवसेनेनं 48 आणि राष्ट्रवादीनं 43 जागा जिंकल्या. मात्र सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही.

हेही वाचा : गृहमंत्र्यांचं नागपूर हादरलं, 24 तासात झाली तिघांची हत्या

धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्हा परिषद महाविकास आघाडीनं ताब्यात घेतली. काँग्रेसनं नागपूर झेडपीत सर्वाधिक जागा जिंकल्यात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला. ग्रामीण भागीतील भाजपच्या सत्तेला यामुळं सुरुंग लागला. तर अकोला झेडपीतही भाजपला धक्का बसला. महाविकास आघाडीनं अकोला झेडपीत सत्तेच्या चाव्या हाती घेतल्या. तर अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा बहुजन विकास  आघाडी किंग मेकर ठरला. त्यामुळं अकोला जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता राहणार आहे. तर वाशिम जिल्हा परिषदही महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली. नंदुरबार जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.

भाजप आऊट, शिवसेना इन

पालघर जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता खालसा करत शिवसेनेनं सत्ता काबीज केली.  धुळे जिल्हा परिषद केवळ भाजपच्या ताब्यात आली. एकूणच काय तर मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून भाजपला जोरदार दणका मिळाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून भाजपची पुढील वाट आणखी बिकट होणार आहे.याची चुणूक जिल्हा परिषदेतून लागली.  त्यामुळं भाजपला ग्रामीण भागातील नाळ आणखी घट्ट करण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे, हेच या निकालातून स्पष्ट झालंय.

======================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 08:14 PM IST

ताज्या बातम्या