मुंबई, 26 ऑगस्ट : काँग्रेसच्या वर्च्युअल बैठकीत आज विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत जेईई, नीट आणि जीएसटी या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांनी ऊहापोह केला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जेईई आणि नीट या परीक्षांविरोधात संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी केली. सर्वच मुख्यमंत्र्यांनी सध्या कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन केलं. दुसरीकडे जीएसटी आणि केंद्राकडून मिळत नसलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ने फ़ेडरल स्ट्रक्चर को ध्यान में रखकर हमारी घटना बनाई है। उस घटना में जो भी अधिकार सबको दिए है उसका अगर हम आदर नहीं करेंगे तो फिर हमारे यहां डेमोक्रेसी है कहां?"
आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहे, अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची? असं होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे फेडरल स्ट्रक्चर लक्षात घेऊन आपली राज्यघटना तयार केली आहे. त्या घटनेत सर्वांना अधिकार दिले आहेत. जर आपण त्याचा आदर करणार नाही, तर मग आपल्याकडे लोकशाही कुठे आहे?
जेईई आणि नीटच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, परीक्षा घ्यायला हव्यात पण परिस्थिती सुधारल्यानंतर. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर 97000 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. जर आपल्याबाबत अशी परिस्थिती ओढावली तर काय करणार?