फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने बदलला प्लान, 'या' ठिकाणी आमदारांना हलवलं!

फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने बदलला प्लान, 'या' ठिकाणी आमदारांना हलवलं!

संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास काँग्रेसचे आमदार भोपळकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. भाजपच्या 105 आमदार आणि अपक्षांची साथ सोडता अजित पवारांबरोबर नेमके कोण आणि किती आमदार भाजप सरकारमध्ये सामील होतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आमदार फोडाफोडीचं भय आता सर्वच पक्षांना आहे. काँग्रेसने यासाठी मोठं पाऊल उचलल्याची बातमी आहे. काँग्रेसचे सगळे आमदार भोपाळला जाणार आहे. विजय वडेट्टीवार यांच्या निवास स्थानाहुन सर्व काँग्रेस आमदार निघणार असून ते भोपाळला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास काँग्रेसचे आमदार भोपळकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. जयपुर ऐवजी यावेळी भोपाळला मुक्काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात सरकार भाजपचं असल्याने मुंबईचा पर्याय शक्यतो टाळला गेला आहे. मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्येच काँग्रेस आपल्या आमदारांना रवाना करेल, अशी शक्यता होती. त्यातही जयपूरचा पर्याय सर्वात जवळचा असल्याचं वृत्त होतं.

दुपारी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहमद पटेल यांनी सरकार बनवण्याची शक्यता अजून शिल्लक असल्याचं सांगितलं. "अजूनही आमचं सरकार येऊ शकतं, असं स्पष्ट करताना ते म्हणाले, "आमचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत."

"महाराष्ट्रात राजकीय कांड झालं आहे. आमच्याकडून झालेल्या विलंबामुळे नव्हे, तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे हे कांड झालं आहे", असंही अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच भाजपने हा धक्का दिला. त्याविषयी बोलताना अहमद पटेल म्हणाले, "आमची कालची चर्चा चांगली झाली होती. भाजपने महाराष्ट्रात घाईघाईने शपथविधी उरकला. सरकारस्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहूनच लक्षात येतं यात काळंबेरं आहे. हे सरकार कायद्याला धरून झालेलं नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करू."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या