अकोला, 05 ऑगस्ट : शहरातील तुकाराम चौक परिसरातील रस्ता बांधून तीन वर्ष झाले. मात्र, अजूनही पथदिवे ( Street lights ) लावले नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे झगमगाट पाहायला मिळतो, तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या ( Akola Municipal Corporation ) विद्युत विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य. याबाबत संबंधित विभागाला तक्रार देऊन देखील समस्या जैसे थे असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अकोला शहरातील भोला सुपर शॉपी ते मलकापूर रोड तीन वर्षापूर्वी तयार करण्यात आला. तीन वर्ष लोटली तरी अद्याप या मार्गावर पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. येथील स्थानिक नागरिकांना, दुकानदारांना, पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला शहरातून जाणारा हा मलकापूर रस्ता शेजारील तीन ते चार खेड्यांना जोडणारा आहे. हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. रात्रीच्या वेळी वाहने भरधाव वेगाने वाहतात. यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात येथील रस्ता ओलांडणे किंवा रस्त्याने ये-जा करणे भीतिदायक झाले आहे. येथील अंधारामुळे परिसरात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. भोला सुपर शॉपी ते मलकापूर रोडवर विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस, कॅन्सरचे तुकाराम हॉस्पिटल, तसेच अनेक दुकाने असल्याने येथे नेहमीची वर्दळ असते. लवकरात लवकर पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं
महानगरपालिकेला जाग कधी येईल?
रस्त्यावरील अंधारामुळे आणि पोलसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे या परिसरात अपघात होतात. वर्दळीसाठी त्रास होतो. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मोठा अपघात झाल्यानंतरच महानगरपालिकेला जाग येईल का, असा संतप्त सवाल स्थानिक दुकानदाराने केला आहे.
हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report
लवकरच काम पूर्ण होईल
महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यांना विचारणा केली असता, या रस्त्यावर विद्युत खांब उभे करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला पोलची ऑर्डर दिली असून लवकरच ते काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola