अकोला, 24 जुलै : बालकांना शिक्षणाचे संस्कार देण्याचे दालन म्हणून अंगणवाडीकडे (Anganwadi) पाहिले जाते. मात्र, अकोला तालुक्यातील घुसर येथील अंगणवाडीला घाण पाण्याचा विळखा आहे. या साचलेल्या पाण्यात गावातील मोकाट जनावरे बसतात. परिसरात साप, विंचवाची देखील भीती आहे. अशातच रस्ता काढत चिमुकल्यांना अंगणवाडीत यावे लागत आहे. यामुळे अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अकोला तालुक्यातील सात हजार लोकसंख्या असलेलं घुसर गाव. गावात चार अंगणवाडी आहेत. पैकी तीन अंगणवाडी परिसरात सांडपाणी जमा होत आहे. अंगणवाडीत शिकण्याकरिता येणाऱ्या चिमुकल्यांचे हाल पाहून या विद्यार्थ्यांचे भवितव्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. घाण पाण्यातून वाट काढत लहान मुले या अंगणवाडीत येतात. अंगणवाडीच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे आणि घाणीमुळे येथे साप, विंचू देखील निघतात. यामुळे पालकांनी आपले मुले अंगणवाडीत पाठवणे बंद केले आहे. वारंवार सांगून देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त
पालकांनी मुलांना अंगणवाडीत पाठवणे केले बंद
अंगणवाडी शाळा परिसरातील घाण, दूषित पाणी यासंदर्भात आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी दिल्या, निवेदन दिले आहेत. पण यावर कुठलीही उपाय योजन करण्यात आली नसल्याचे अंगणवाडी सेविका गोकुळा रहाणे यांनी सांगितले. तर आमच्या अंगणवाडी परिसरात मच्छरांचा त्रास आहे, पावसामुळे अंगणवाडीमध्ये ओल होत आहे. अशी परिस्थितीमुळे पालकांनी मुलांना अंगणवाडीत पाठवणे बंद केल्याचे दुसऱ्या अंगणवाडीच्या सेविका सुमित्रा खडसे यांनी सांगितले.
हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO
घाणीमुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात
गावातील सांडपाणी अंगणवाडी परिसरात जमा होते. या पाण्यामुळे आणि येथील घाणीमुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात साप, विंचू देखील असल्याची भीती आहे. यामुळे आमच्या मुलांच्या जीवितालाही धोका असून मी मुलांना अंगणवाडीत पाठवणे बंद केल्याचे ग्रामस्थ दशरथ सातपुते सांगतात. अंगणवाडी शाळेत मुलांना यायला रस्ता नाही. अशा घाण पाण्यातून मुलं रस्ता काढत येतात. या पाण्यात साप, मच्छर असून मुलांना अंगणवाडीत पाठवणे कठीण आहे. येथील परिसरात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थ गणेश तारापुरे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Maharashtra News