अकोला, 27 जुलै : शहरासह अनेक भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपी कोणत्याही प्रकारची सुरक्षा काळजी न घेता धोकादायकरित्या सताड उघडे पडलेले आहेत. उघडे डीपी (transformer DP) रहदारीच्या रस्त्यालगत असल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना व जीवितहानी होऊ शकते. या उघड्या डीपींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी डीपीची कामे केली जातात. मात्र, यंदा महावितरणकडून (Msedcl) याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकोला शहरातल्या जठारपेठ, तापडिया नगर, रामदासपेठ, राऊतवाडी, जुनेशहर, कौलखेड अकोट फाइल, न्यू तापडिया नगर, मोहम्मद अली चौक, खैर मोहम्मद प्लॉट, डाबकी रोड, नायगाव, गुडदी परिसर, ओपन थेटर चौक, बस स्टँड चौक, या भागातील इलेक्ट्रिक पोल वर असलेल्या डीपी उघड्यावर असल्याचे पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा- एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story
शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपी कोणत्याही प्रकारचे झाकण न लावता उघड्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असून या उघड्या डीपी अधिक धोकादायक बनत आहेत. मोकाट जनावरांचा, लहान मुलांचा वा मोठ्या व्यक्तींचाही जाता-येता त्याला धक्का लागू शकतो. या डीपीमधील वीजप्रवाह उच्च दाबाचा असल्यामुळे थोडासा स्पर्श झाला तर जीवघेणा अपघात होऊ शकतो. मात्र, महावितरण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून लवकरात लवकर या उघड्या डीपी झाकाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report
शहरातील उघड्या डीपीची झाकणे बसवण्यात येत आहेत. नागरिकांना कुठे उघडे डीपी दिसले तर महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित कळवावे. जेणेकरून उघड्या डीपींना झाकण लावण्यात येतील आणि कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली जाईल. झाडांच्या फांद्या तारांना लागत असतील किंवा त्यावर काही पडलेलं असेल तरी देखील महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आमच्या वेबसाईटवर किंवा कस्टमर केअर नंबरवर (9930399303) संपर्क साधावा असे आवाहन शहरी भागातील महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Maharashtra News